
आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत दररोज १२ तास अभ्यास; जिद्द व मेहनतीच्या जोरावर मिळवले यश
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील आदेगाव येथील शेतकरी कुटुंबातील अमोल कैलास बासेवाड यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी म्हणून निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अमोल यांनी सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


अमोल बासेवाड यांचे वडील कैलास बासेवाड आणि आई विजयालक्ष्मी बासेवाड यांनी शेतीत कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. आर्थिक व ग्रामीण परिस्थितीची जाणीव असतानाही मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले.


आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मनात ठेवून अमोल यांनी अभ्यासात सातत्य कायम ठेवले. दररोज तब्बल १२-१२ तास अभ्यास करत त्यांनी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी केली आणि अखेर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी म्हणून निवड होण्याचे स्वप्न साकार केले.


विशेष म्हणजे अमोल यांचे बंधूही दिल्ली येथे UPSC परीक्षेची तयारी करत आहेत. त्यामुळे बासेवाड कुटुंबातील दोन्ही मुलांनी शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून यश मिळविण्याच्या दिशेने घेतलेली वाटचाल परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


शेतकरी कुटुंबातून आलेल्या अमोल यांच्या या यशामुळे आदेगावसह हिमायतनगर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या निवडीबद्दल बासेवाड कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच गोल्ला-गोलेवार यादव समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अमोल यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
