
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| डीजेचा दणदणाट नाही, ध्वनिप्रदूषणाचा गोंगाट नाही… टाळ-मृदंगाचा निनाद, भजन-अभंगांचा गजर, फुलांची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हिमायतनगर शहरातील गणरायाला यंदा भावपूर्ण निरोप देण्यात आला. शासन व पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत वारकरी परंपरेला प्राधान्य दिल्याने विसर्जन मिरवणुकीत भक्ती आणि संस्कृतीचे दर्शन घडले.


शुक्रवारी सुरू झालेली प्रमुख गणेश मंडळांची मिरवणूक अनंत चतुर्दशीचा मुहूर्त उशिरा असल्याने शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. सकाळी साडेसात वाजता प्रमुख गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात भजनी मंडळांनी अभंग व भक्तिगीते सादर केली. फुलांची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला.



सायंकाळी हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी विसर्जनस्थळी भेट देत व्यवस्थेची पाहणी केली. प्रशासनाकडून नियोजनाचा आढावा घेत त्यांनी गणेशभक्तांना शांततेत व शिस्तीत विसर्जन करण्याचे आवाहन केले. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनीही विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत गणेशभक्तांचा उत्साह वाढविला.



श्री कनकेश्वर तलावाच्या काठावरील विहिरीत विसर्जनासाठी नगरपंचायतीने विशेष व्यवस्था केली होती. मुख्याधिकारी समाधान मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविणे, विद्युत रोषणाई, अग्निशमन दल, जीव रक्षक आणि अन्य सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, मंडळ अधिकारी चव्हाण, नायब तहसीलदार श्री. पंगे, तलाठी श्री. रामदासी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी व्यवस्थेची पाहणी केली.



पोलिसांचा चोख बंदोबस्त; विसर्जन निर्विघ्न
विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शेख यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. डीजेविरहित मिरवणूक, वारकरी परंपरेचा जागर आणि शिस्तबद्ध विसर्जन यामुळे हिमायतनगरचा यंदाचा गणेशोत्सव भक्ती, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक परंपरेचा संदेश देणारा ठरला.
