
व्यापारी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : नारायण पाटील
शहापूर, देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील शेळगाव नरसिंह येथे मंगळवार पासून नव्याने आठवडी बाजार सुरू होत आहे. या बाजारात भाजीपाला विक्रेते, कापड व्यापारी, कडधान्य विक्रेते यांच्यासह विविध व्यापारी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण पाटील शेळगावकर यांनी केले आहे.


सध्या शेतकऱ्यांना सोयाबीन, मूग, उडीद आदी खरीप पिकांच्या उत्पादनासाठी मोठा कालावधी व खर्च करावा लागत आहे. मात्र बदलते हवामान, विविध रोगराई आणि पावसाची अनिश्चितता यामुळे उत्पादनात मोठी घट होत असल्याचे चित्र आहे. परिणामी शेतीवरील खर्च वाढत असून शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजाही वाढत आहे.


या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी नगदी उत्पन्न मिळावे आणि दैनंदिन गरजांचा खर्च भागवता यावा, यासाठी भाजीपाला तसेच अन्य अल्पकालीन पिकांकडे वळत आहेत. गावागावातच विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळत आहे.


याच उद्देशाने शेळगाव नरसिंह येथे सुरू होणारा आठवडी बाजार शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या बाजारात भाजीपाला, कडधान्ये, कापड तसेच विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री-वितरण व्यवस्था उपलब्ध होणार आहे.


शेळगाव नरसिंह व परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी मंगळवारच्या आठवडी बाजारात सहभागी होऊन बाजाराला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नारायण पाटील शेळगावकर यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.
