कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने ५० हजारांची मदत द्या

अखिल भारतीय छावा संघाची मागणी; उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन
देगलूर, गंगाधर मठवाले| पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके हातची गेली असून, दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघाच्या शहापूर-देगलूर तालुका शाखेने केली आहे. संघाचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांनी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार, देगलूर यांना निवेदन देऊन तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला किमान ५० हजार रुपये तातडीचे अनुदान देण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र पेरणीनंतर पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिके उगवण्यापूर्वीच संकटात आली, तर काही ठिकाणी उगवलेली पिके निदणी, फवारणी व कोळपणीपर्यंत आली होती. त्यानंतरही पावसाने दडी मारल्याने उभी पिके अक्षरशः होरपळून गेली आहेत.

पिकांवर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता मावळल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. “पीक नाही तर उत्पन्न नाही; मग कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची?” असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

शेतकऱ्यांची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून देगलूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला किमान ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनावर शिवराज पाटील, सोमनाथ पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मंगेश पाटील, जावेद धनजकर, गजानन पाटील, दीपक ढगे, चंद्रकांत पाटील यांच्यासह शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!