नांदेडकरांसाठी मनपाचा मोठा दिलासा; आता कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयातून जन्म-मृत्यू दाखला मिळणार

नांदेड, प्रतिनिधी| नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आता संबंधित क्षेत्रीय कार्यालयातच जाण्याची आवश्यकता राहणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी मनपा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक १ ते ६ तसेच मनपा मुख्यालयातील अविरत विभागातून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

महानगरपालिका हद्दीतील कोणत्याही शासकीय अथवा खासगी दवाखाना, रुग्णालय किंवा रुग्णालयाबाहेर जन्म अथवा मृत्यू झाल्यानंतर त्याची रीतसर नोंदणी झाल्यास, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांना आपल्या सोयीच्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयात जाता येणार आहे. त्यामुळे शहरातील एका भागातील नागरिकांना केवळ संबंधित भागातील कार्यालयातच जाण्याची गरज भासणार नसून नजीकच्या पालिका कार्यालयातूनच प्रमाणपत्र घेता येणार आहे.

काही सेवा मात्र मुख्यालयातूनच
नागरिकांच्या सोयीसाठी जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या सेवांचे विकेंद्रीकरण करण्यात आले असले तरी तांत्रिक कारणांमुळे काही सेवा केवळ मनपा मुख्यालयातील अविरत विभागातूनच उपलब्ध राहणार आहेत.

सन २०१७ पूर्वीचे जुने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, पूर्वी काढलेल्या प्रमाणपत्रावर क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र, तसेच यापूर्वीच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्राची दुसरी प्रत हवी असल्यास नागरिकांना मनपा मुख्यालयातील अविरत विभागाशी संपर्क साधावा लागणार आहे.

केंद्र शासनाच्या सीआरएस प्रणालीमध्ये एकच युजर आयडी उपलब्ध असल्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांमधून क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र निर्गमित करता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार
महापालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांना अनावश्यक प्रवास करावा लागणार नाही. आपल्या परिसराच्या जवळ असलेल्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयातून प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ, श्रम आणि प्रवासाचा खर्च वाचणार आहे. तसेच प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेलाही अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.

मनपा आयुक्तांचे आवाहन
महापालिका प्रशासनाने तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांसाठी अधिक सुलभ व गतिमान सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सुधारित सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!