
मुलांच्या शिक्षणाची चिंता नको; दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत दिला आधार


हिमायतनगर | उत्कर्ष मादसवार : दुष्काळाचे संकट, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने आधीच अडचणीत सापडलेल्या कामारी येथील शिरफुले कुटुंबाला हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी मदतीचा हात दिला. गुरुवारी त्यांनी कै. सुभाष केशवराव शिरफुले यांच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि मुलांच्या शिक्षणासाठी तब्बल १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली.


कै. सुभाष शिरफुले यांच्या निधनानंतर कुटुंबावर आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे. त्यातच सततची दुष्काळी परिस्थिती आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा कुटुंबासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कदम कोहळीकर यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.


यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधत “मुलांच्या शिक्षणात आर्थिक अडचण अडथळा ठरू नये,” या भावनेतून १ लाख रुपयांची मदत करण्यात आली. संकटाच्या काळात केवळ सांत्वनाचे शब्द न देता प्रत्यक्ष आर्थिक आधार देण्याच्या या भूमिकेची परिसरात चर्चा होत आहे.



दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे आणि पुढच्या पिढीच्या शिक्षणाला आधार देणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचा संदेश या मदतीतून अधोरेखित झाला आहे.
“शिक्षण थांबता कामा नये; संकट कितीही मोठे असले तरी कुटुंबाच्या भवितव्याला आधार मिळालाच पाहिजे,” या भूमिकेतून करण्यात आलेल्या मदतीमुळे शिरफुले कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी गावातील नागरिक, कार्यकर्ते व नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते.
