
हलाखीच्या परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेत यश; शहापूरच्या गुणवंत सुपुत्राचे सर्वत्र कौतुक
देगलूर /शहापूर, प्रतिनिधी| प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर शहापूर येथील माधव पुढलिक गायकवाड यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पवित्र पोर्टलअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत पदवीधर शिक्षकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे शहापूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून ग्रामस्थ, मित्रमंडळी व शिक्षकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


माधव गायकवाड हे शहापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये अंशकालीन निर्देशांक पदावर कार्यरत होते. तुटपुंज्या मानधनावर संसाराचा गाडा चालवत असतानाही त्यांनी शिक्षण व स्पर्धा परीक्षेची तयारी सोडली नाही. दिवसभर शाळेचे काम केल्यानंतर वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करत त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविले.


गायकवाड यांनी शिक्षणासोबतच चित्रकलेतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महापुरुष, नेते व शिक्षकांची हुबेहूब तेलचित्रे साकारत त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नामवंत कलाकार म्हणून लौकिक मिळविला आहे. महाराष्ट्रातील सीएम चषक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्रथम क्रमांक, तसेच रांगोळी स्पर्धांमध्येही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.


घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही ध्येय निश्चित करून त्यासाठी कोणतीही पराकाष्ठा करण्याची तयारी त्यांनी ठेवली. अंशकालीन शिक्षक म्हणून काम करताना मिळणारे अल्प मानधन आणि त्याचवेळी स्पर्धा परीक्षेची तयारी, असा संघर्ष करत त्यांनी अखेर आपल्या मेहनतीचे चीज केले. माधव गायकवाड यांच्या या यशाबद्दल शहापूर ग्रामस्थ, शिक्षकवृंद, मित्रपरिवार व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


