जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

शहापूरमध्ये गणेशोत्सवात भक्तिमय वातावरण; क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

देगलूर/शहापूर | शहापूर येथील जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंडळाच्या माध्यमातून एकतेचा संदेश देत सकाळ-सायंकाळ पूजा, पाठ व आरतीचे आयोजन करण्यात येत असून, दीड क्विंटल तांदळाचे अन्नदान करण्यात आल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या सर्वत्र तरुणाई विविध क्रीडा स्पर्धांमधून मैदान गाजवत असताना जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण दहा संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५ हजार १०० रुपये निखिल अचनगार यांच्या स्मरणार्थ व्यंकट मामडे यांच्या वतीने देण्यात आले, तर द्वितीय पारितोषिक ३ हजार १०० रुपये मलनरेड्डी चितलवार यांच्या वतीने देण्यात आले.

महिलांसाठीही डबलबार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी २ हजार १०० रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी १ हजार १०० रुपयांचे पारितोषिक मंडळाच्या वतीने देण्यात आले. लहान चिमुकल्यांसाठी खुर्ची स्पर्धेचे आयोजन करून प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसोबतच युवक, महिला व बालकांसाठी विविध उपक्रम राबवून नवचैतन्य निर्माण करण्याचा उपक्रम जय भवानी गणेश मंडळाकडून राबविण्यात येत आहे. त्यामुळे शहापूर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय भवानी गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!