
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन; घोषणाबाजी करत आंदोलकांची धडक
देगलूर, गंगाधर मठवाले| नांदेड जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके संकटात सापडली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविमा व खरीप पीककर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी सोमवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.


आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी निवासी सहाय्यक जिल्हाधिकारी अंबेकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे प्रतीक म्हणून वाळलेले सोयाबीन हातात देत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.


यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विलंब न करता वस्तुनिष्ठ पीक नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.


शेतमजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणीही आंदोलकांनी केली. शेतीची कामे ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील शेतमजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.



आंदोलनात शेतकरी नेते डॉ. भगवान मनुरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, माजी जि.प. सदस्य नागनाथ वाडेकर, विभागप्रमुख हनमंत राजुरे लख्खेकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
निवासी सहाय्यक जिल्हाधिकारी अंबेकर यांनी निवेदन शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासन आता काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांचे लक्ष लागले आहे.
