
तब्बल तीन-चार दशकांनंतर खुले आरक्षण; ‘मीच सरपंच’ म्हणत इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
देगलूर /शहापूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण यंदा खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तब्बल तीन-चार दशकांनंतर सरपंचपद खुले झाल्याने अनेक इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून, “सरपंच तर मीच!” अशा आविर्भावात अनेक जण वावरताना दिसत असल्याची चर्चा गावात रंगली आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून विविध आरक्षणाच्या प्रवर्गात सरपंचपद गेले होते. यंदा खुले आरक्षण जाहीर होताच ग्रामपंचायत निवडणुकीच्या संभाव्य राजकीय समीकरणांना वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी आपापल्या समर्थकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.


एकाच पदासाठी अनेक दावेदार – सरपंचपद खुले झाल्याने गावातील विविध राजकीय गट आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये पदासाठी चढाओढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले काही गट आगामी निवडणुकीत समीकरणानुसार एकत्र येण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत कोण कोणत्या गटासोबत जाणार, कोण उमेदवारी मागणार आणि सरपंचपदासाठी कोणाला पाठिंबा मिळणार, याबाबत गावातील राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


आरक्षण बदलताच इच्छुकांची संख्या वाढली – यापूर्वीच्या आरक्षणामुळे मर्यादित सामाजिक गटातील उमेदवारांना संधी मिळत होती. आता खुले आरक्षण असल्याने इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका सरपंचपदासाठी अनेक दावेदार उभे राहिल्यास निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गावाच्या विकासासाठी प्रत्यक्षात कोण काम करणार, निधी आणण्यासाठी कोण पाठपुरावा करणार आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराला दिशा कोण देणार, यावर मतदारांकडून चर्चा होणे अपेक्षित आहे.


‘सरपंच कोण?’ यापेक्षा ‘गावाचा विकास कोण करणार?’ हा प्रश्न महत्त्वाचा – आरक्षण खुले झाल्याने राजकीय इच्छुकांमध्ये उत्साह असला तरी सरपंचपदाच्या शर्यतीपेक्षा गावाच्या विकासाचा अजेंडा महत्त्वाचा ठरणार आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, नाल्या, पथदिवे, ग्रामपंचायत सुविधा आणि शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता असलेला नेतृत्वाचा चेहरा गावाला अपेक्षित आहे.
आगामी काळात कोणते राजकीय गट एकत्र येतात, कोण स्वतंत्रपणे मैदानात उतरते आणि सरपंचपदासाठी अंतिम उमेदवार कोण असतील, याकडे शहापूर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. खुले आरक्षण जाहीर होताच सुरू झालेली ही राजकीय लाथाळी निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोणते वळण घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
