
५ ऑक्टोबरच्या पंचनाम्यांवर शेतकऱ्यांचा संताप — “पीक काढल्यानंतर पंचनामा कशाचा?”
देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुका व परिसरात पावसाने डोळे वटारल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी संकटाचा ठरला आहे. पावसाअभावी सोयाबीन, मूग, उडीद यासह खरीप पिकांची अवस्था बिकट झाली असून अनेक ठिकाणी पिके करपून गेली आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ५ ऑक्टोबरपासून पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असले, तरी तोपर्यंत सोयाबीनची कापणी, रास आणि मळणी होऊन गेली तर पंचनामा नेमका कशाचा होणार? असा संतप्त सवाल शहापूर परिसरातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.


यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी करून कोळपणी, निंदणी, फवारणी यासाठी मोठा खर्च केला. अनेकांनी बँकांचे तसेच खासगी कर्ज घेतले, तर काहींनी घरातील किडूक-मिडूक विकून शेतीत पैसा ओतला. सुरुवातीला पिके डोलताना दिसल्याने उत्पादनाची आशा निर्माण झाली होती; मात्र पावसाने पाठ फिरवल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली.


मूग-उडदाची घट; सोयाबीनही हातातून गेले – पावसातील मोठ्या खंडाचा सर्वाधिक फटका खरीप पिकांना बसला आहे. मूग आणि उडदाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून अनेक भागांत सोयाबीनची पिके करपून गेल्याचे चित्र आहे. नांदेड जिल्ह्यातही पावसाच्या अनियमिततेचा परिणाम सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांवर झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या आढाव्यात नमूद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती नवीन नाही. कधी अतिवृष्टी, कधी पावसाचा खंड, कधी बाजारभावाचा फटका आणि कधी उत्पादन खर्चात वाढ—अशा अनेक संकटांचा सामना करत शेतकरी शेती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. यंदा मात्र पाऊसच दगा देत असल्याने खरीप हंगामाचे आर्थिक गणितच कोलमडले आहे.


पंचनामे उशिरा झाले तर मदतीपासून वंचित राहण्याची भीती – शासनाकडून पंचनामे ५ ऑक्टोबरपासून करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, तोपर्यंत शेतकरी रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत सुरू करणार आहेत. सोयाबीन तीन महिन्यांचे पीक असल्याने अनेक शेतकरी कापणी करून रास-मळणीच्या तयारीत आहेत. त्यामुळे पंचनामे होईपर्यंत पीक शेतात शिल्लक राहणार तरी किती? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कृषी विभागानेही पिके वेळेपूर्वी काढली जात असल्याने वेळेत पीक कापणी प्रयोग व पंचनामे न झाल्यास सरकारी मदतीसाठी अडचण येऊ शकते, अशी परिस्थिती लक्षात घेऊन तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे.


“रब्बीची पेरणी करायची की पंचनाम्याची वाट पाहायची?” शेतकऱ्यांसमोर आता दुहेरी कोंडी आहे. एकीकडे शेतातील उरलेसुरले पीक काढून रब्बी हंगामासाठी मशागत करणे गरजेचे आहे, तर दुसरीकडे पंचनाम्याच्या प्रतीक्षेत पीक तसेच ठेवले तर पुढील हंगामाचे नियोजन रखडण्याची शक्यता आहे.
“ऑक्टोबरनंतर शेतात सोयाबीनची रास होऊन जाईल; मग पंचनामा कोणत्या पिकाचा करणार? शेतात धतुराही उरला नसेल तर नुकसानीचा पुरावा कसा मिळणार?” असा सवाल शेतकरी करीत आहेत.
एका दिवसात निर्णय शक्य, मग शेतकऱ्यांसाठी विलंब का? शासनाच्या विविध निर्णय प्रक्रियेत तातडीने निर्णय घेतले जातात. मग हजारो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी एवढा कालावधी का लागतो? असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.
शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे—पंचनाम्याची तारीख येईपर्यंत वाट पाहू नये; ज्या भागात पिकांचे नुकसान झाले आहे, त्या भागात तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत. शेतकरी रब्बीच्या तयारीला लागण्यापूर्वी नुकसानीची नोंद झाली तरच प्रत्यक्ष परिस्थिती शासनाच्या नोंदीत येईल, अशी अपेक्षा आहे.
“शेतात पीक असतानाच पाहणी करा” पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले असताना मदतीची आशा धरून बसलेल्या शेतकऱ्यांना आता तारीख आणि आदेशांपेक्षा प्रत्यक्ष मदत आणि तातडीची नुकसाननोंद महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहावी, पीक काढणीपूर्वी पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रक्रिया जलद करावी, अशी मागणी शहापूर परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
कारण पंचनामा उशिरा झाला आणि तोपर्यंत शेतात पीकच उरले नाही, तर कागदावर नुकसान शोधत बसण्यापेक्षा आजच शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे अधिक गरजेचे आहे.
