शहापूर येथे भरपावसात गणेश विसर्जन शांततेत!

डीजेला फाटा; ढोल-ताशा, टाळ-मृदंग व फटाक्यांच्या आतषबाजीत गणरायाला भावपूर्ण निरोप

शहापूर, गंगाधर मठवाले| शहापूर येथील नवू गणेश मंडळाच्या वतीने नऊ दिवस भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दररोज सकाळ-संध्याकाळ आरती, पूजापाठ तसेच विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नऊ दिवसांच्या उत्सवानंतर भरपावसातही मोठ्या उत्साहात आणि शांततेत गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

नवू गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्तीची आकर्षक सजावट करून ती ट्रॅक्टरवर विराजमान केली. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून ढोल-ताशा, टाळ-मृदंगाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

महिला, युवकांचा उत्स्फूर्त सहभाग – मिरवणुकीत महिला मंडळासह नवतरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.भरपावसातही गणेशभक्तांचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मिरवणूक गावालगत असलेल्या तलावाजवळ पोहोचल्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Oplus_16908288

पोलिसांचा चोख बंदोबस्त – शहापूर येथे पोलीस उपनिरीक्षक किरण बेबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कनकवले तसेच पोलीस फौजफाट्याने विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंदोबस्त ठेवला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडली.

नऊ दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर भरपावसातही शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडलेले गणेश विसर्जन हे शहापूरच्या गणेशोत्सवातील सामाजिक सलोखा आणि उत्साहाचे दर्शन घडविणारे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!