
तुपशेळगाव–शहापूर मार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह; मध्यभागी भेगा, कडेला मुरुमही नाही — चौकशी करून दोषींवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
देगलूर /शहापूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तुपशेळगाव ते शहापूर या महत्त्वाच्या मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण आमदार निधीतून तब्बल एक कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात आले. मात्र, रस्ता पूर्ण होऊन अवघे दोन महिने उलटत नाहीत तोच रस्त्याच्या मध्यभागी भेगा पडल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक प्रमाणात मुरुम न टाकल्यामुळे वाहनधारक आणि शेतकऱ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.


तुपशेळगाव ग्रामस्थांकडून या रस्त्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. माजी आमदार सुभाष साबणे यांच्या कार्यकाळापासून रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यानंतर रस्त्याचे काम मार्गी लागले. त्यामुळे आता हा रस्ता किमान अनेक वर्षे टिकेल आणि शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा मिळेल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती.


दोन महिन्यांतच भेगा; मग कामाचा दर्जा तपासला का? रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या भेगांमुळे अवघ्या काही आठवड्यांतच काँक्रीटच्या कामाची गुणवत्ता चर्चेत आली आहे. एक कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्याची अशी अवस्था होत असेल, तर कामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य, काँक्रीटची जाडी, बांधकाम पद्धती आणि तांत्रिक निकषांची पूर्तता झाली का? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरुम टाकून रस्ता योग्य पातळीवर आणण्यात न आल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी रस्ता अरुंद वाटत असल्याने समोरून वाहन आल्यास वाहनचालकांना कसरत करावी लागत असल्याची तक्रार आहे.


‘निधी जनतेच्या सुविधेसाठी की निकृष्ट कामासाठी?’ अतिदुर्गम भागातील गावांना विकासकामांसाठी निधी मिळवणे कठीण जाते. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर तुपशेळगाव–शहापूर रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला. त्यामुळे मिळालेला निधी दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्यासाठी वापरला जावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती.
मात्र, रस्ता अल्पावधीतच भेगाळल्याने “इतका मोठा निधी खर्च करूनही रस्ता दोन महिन्यांतच खराब होणार असेल, तर कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी कोणाची?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.


कंत्राटदारावर कारवाईपूर्वी कामाची तांत्रिक तपासणी करा – या प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी, कामाची मोजमाप पुस्तिका (एम.बी.), वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता, काँक्रीटची जाडी, मिश्रणाचे प्रमाण, क्युरिंग प्रक्रिया तसेच संबंधित देयकांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कामात त्रुटी किंवा नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधित जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामासंदर्भात आमदार किंवा संबंधित कंत्राटदारांची अधिकृत बाजू उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध केली जाणे आवश्यक आहे. चौकशीअंतीच कामातील त्रुटी किंवा जबाबदारी निश्चित होऊ शकते, अशी भूमिका ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
