ग्रामीण भागातील संस्कृती दोसलवार यांची एमबीबीएससाठी निवड

शहापूर तालुक्यातील वनाळी गावच्या विद्यार्थिनीची हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी निवड; माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार यांच्या हस्ते सत्कार

देगलूर /शहापूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील वनाळी येथील संस्कृती गंगाधर दोसलवार हिची हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीत सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि ध्येयवादी प्रयत्नांच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संस्कृतीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल देगलूर येथील माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी संस्कृतीचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना शैलेश उल्लेवार म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर निश्चित ध्येय ठेवून सातत्य आणि चिकाटीने प्रयत्न केले, तर यश निश्चित मिळते. त्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. आजचे युग हे स्पर्धेचे असून विद्यार्थी आणि पालकांनी बदलत्या परिस्थितीचा योग्य वेळी आढावा घेऊन भविष्यातील ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे.”

पालकांचे योग्य मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांचा संगम झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी शैक्षणिक झेप घेऊ शकतात, हे संस्कृती दोसलवार हिच्या यशाने सिद्ध केले आहे.

हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या वनाळीसारख्या ग्रामीण गावातून एमबीबीएससाठी निवड होणे ही परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे, गोळा-गोलेवार समाजातून एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थिनी म्हणून संस्कृतीचे यश विशेष उल्लेखनीय ठरत असल्याचे तिच्या कुटुंबीय व मित्रपरिवाराकडून सांगण्यात आले.

संस्कृतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठे ध्येय गाठण्याचा आदर्श निर्माण केला आहे. तिच्या यशाबद्दल मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, सगेसोयरे तसेच परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, संस्कृतीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!