सरिता जडलावार यांना उपक्रमशील व गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

शैक्षणिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान; शिक्षक दिनानिमित्त देगलूर येथे गौरव

देगलूर /शहापूर (प्रतिनिधी) ‘शिक्षण ही केवळ नोकरी नसून समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करण्याचे प्रभावी माध्यम आहे’ हा विचार उराशी बाळगून शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शहापूर येथील पीएम श्री शाळेच्या शिक्षिका सरिता जडलावार यांना ‘उपक्रमशील व गुणवंत शिक्षिका पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट, देगलूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तुषार राठोड, आमदार जितेश अंतापूरकर आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा मीनलताई खतगावकर यांच्या हस्ते सरिता जडलावार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सरिता जडलावार यांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, क्रीडा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले आहेत. विद्यार्थ्यांची आकलनक्षमता, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील राहिल्या आहेत.

शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित व्हावी, यासाठी त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान दिले आहे.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या सरिता जडलावार यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातून तसेच शहापूर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या कार्यक्रमास शिक्षण अधिकारी गोडाजी सर, चामावार गुरुजी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा सन्मान झाल्याने शिक्षक दिनाचा हा सोहळा अधिक प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!