
विकास विक्रम कळकेकर यांचे आवाहन; पांदण रस्त्यांवरील अतिक्रमणे सामोपचाराने हटविण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘शेत सेतू : महापाणंद गतिशक्ती अभियान’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ याचा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे तालुका उपाध्यक्ष विकास विक्रम कळकेकर यांनी केले आहे.


या अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील पांदण व शेतरस्त्यांवरील अतिक्रमणांचा प्रश्न सामोपचाराने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, तसेच सर्व गावांमध्ये विशेष मोहीम राबवून आवश्यक त्या ठिकाणी जाहीर नोटीस काढावी, अशी मागणी कळकेकर यांनी तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.


शेतात जाण्यासाठी आवश्यक असलेले पांदण रस्ते अतिक्रमणामुळे बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे कळकेकर यांनी निवेदनात नमूद केले. यापूर्वी शेतरस्त्यांच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज, शुल्क, मोजणीची प्रतीक्षा आणि त्यानंतर निर्माण होणारे स्थानिक वाद या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा खर्च होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.


या पार्श्वभूमीवर शासनाने शेतरस्त्यांचा प्रश्न अधिक सुलभ पद्धतीने सोडविण्यासाठी सुरू केलेल्या अभियानाकडे शेतकऱ्यांनी संधी म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.


‘महापाणंद ग्रीड’च्या माध्यमातून डिजिटल नोंदणीवर भर – राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे उपग्रहाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रीड’ विकसित करण्याच्या शासनाच्या उपक्रमाचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, असे कळकेकर यांनी सांगितले.
ग्रामपंचायत स्तरावर प्राधान्याने महत्त्वाच्या पांदण रस्त्यांची निवड करून त्यांच्या सीमांकनाची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रक्रियेत शासनाने मोजणी शुल्काबाबत घेतलेल्या निर्णयाचा लाभ पात्र शेतकऱ्यांनी घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.
‘आता नाही तर कधीच नाही’; सामोपचाराने अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन – “वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले शेतरस्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही योग्य संधी आहे. शेतकऱ्यांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून सामोपचाराने पुढे यावे. ज्यांच्या शेतालगत पांदण रस्ते आहेत, त्यांनी स्वेच्छेने अतिक्रमणे हटवून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन विकास कळकेकर यांनी केले.
सामोपचाराने प्रश्न सुटला नाही तर अभियानाच्या नियमांनुसार प्रशासनाने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रशासनाने मोहीम प्रभावीपणे राबवावी – तहसीलदारांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार पठाण यांनी कळकेकर यांचे निवेदन स्वीकारले. तालुक्यातील सर्व गावांमध्ये अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या शेतरस्त्यांचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे कळकेकर यांनी सांगितले.
दरम्यान, पांदण रस्त्यांवरील अतिक्रमणांचा प्रश्न संवेदनशील असल्याने प्रशासनाने गावागावांत संवाद, सामोपचार आणि नियमानुसार सीमांकन यांना प्राधान्य देत ही मोहीम राबविल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

मी सांगतो साहेब तुम्ही पांदन रस्ता कडता का?