‘हर हर महादेव’च्या जयघोषात १४ ज्योतिर्लिंगांचे एकाच ठिकाणी दर्शन

धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी आकर्षक धार्मिक देखावा; महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड, प्रतिनिधी| ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण करणारा देशभरातील १४ ज्योतिर्लिंग मंदिरांचा आकर्षक प्रतिकात्मक देखावा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या मिलरोड येथील निवासस्थानी महालक्ष्मीसमोर साकारण्यात आला आहे. श्रद्धा, कल्पकता आणि कलात्मकतेचा सुंदर संगम असलेल्या या देखाव्याला महिला भाविकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

भारतात भगवान शिवाची १२ ज्योतिर्लिंगे प्रचलित मानली जातात. मात्र नागेश्वर ज्योतिर्लिंगाबाबत गुजरातमधील द्वारका तसेच महाराष्ट्रातील औंढा नागनाथ यांचा उल्लेख केला जातो. त्याच प्रमाणे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाबाबत झारखंडमधील देवघर तसेच महाराष्ट्रातील परळी वैजनाथ या दोन्ही ठिकाणांचा उल्लेख आढळतो. या संकल्पनेतून ॲड. दिलीप ठाकूर यांनी यंदा १४ ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांचे प्रतिकात्मक रूप एकाच ठिकाणी साकारले आहे. विशेष म्हणजे त्यांनी या सर्व १४ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले असल्याचे सांगण्यात आले.

या देखाव्यात गुजरातमधील प्रभास पाटण येथील सोमनाथ, आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन, मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर, खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर, उत्तराखंडमधील केदारनाथ, महाराष्ट्रातील भीमाशंकर, उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, झारखंडमधील देवघर येथील वैद्यनाथ, गुजरातमधील द्वारका येथील नागेश्वर, तमिळनाडूमधील रामेश्वरम येथील रामेश्वर, महाराष्ट्रातील वेरूळ येथील घृष्णेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या १४ तीर्थक्षेत्रांच्या मंदिरांचे प्रतिकात्मक दर्शन घडविण्यात आले आहे.

मंदिरांच्या प्रतिकृती, वैशिष्ट्यपूर्ण सजावट आणि देखाव्याची कल्पक मांडणी यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. देशाच्या विविध भागांत असलेली शिवतीर्थे एका छोटेखानी धार्मिक विश्वाच्या रूपात नांदेडमध्ये पाहण्याची संधी भाविकांना मिळत आहे. त्यामुळे विशेषतः महिला भाविकांमध्ये या देखाव्याबद्दल उत्सुकता असून मोठ्या संख्येने महिला दर्शनासाठी येत आहेत.

धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी दरवर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक विषयांवर आकर्षक देखावे साकारण्याची परंपरा आहे. यापूर्वी येथे अमरनाथ गुहेचा देखावाही साकारण्यात आला होता. दरवर्षी नवीन संकल्पना, आकर्षक सजावट आणि कल्पक मांडणीच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाचा १४ ज्योतिर्लिंगांचा देखावा या परंपरेतील विशेष आकर्षण ठरला आहे.

शनिवारी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा देखावा नागरिक आणि भाविकांसाठी खुला राहणार आहे. शिवभक्त तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन या अनोख्या धार्मिक देखाव्याचे दर्शन घ्यावे, असे आवाहन माजी नगरसेविका जयश्री दिलीपसिंह ठाकूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!