मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ३२ वा वर्धापन दिन उत्साहात

हिमायतनगर (प्रतिनिधी) येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ३२ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रेरणास्थान हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम. पी. गुंडाळे, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक प्रा. रणखांब, उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. कांगणे, प्रा. दिवडे व प्रा. पाटील यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मे, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यानंतर प्रा. रणखांब यांच्या हस्ते मुख्य राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर प्रा. एम. पी. गुंडाळे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर आयोजित सभेत विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान यावर आपली मनोगते व्यक्त केली. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. वसंत कदम यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा गौरवशाली इतिहास विशद करताना निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याची मुक्तता करण्यासाठी हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची विविध उदाहरणे सांगितली. त्यांच्या त्यागामुळेच मराठवाड्याला स्वातंत्र्याचा श्वास घेता आला, असे त्यांनी नमूद केले.

ऐतिहासिक वारसा, हुतात्म्यांचे बलिदान आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणाऱ्या या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!