नांदेड-भोकर मार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा! आ. श्रीजया चव्हाण यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

नांदेड| नांदेड ते भोकर या वर्दळीच्या मार्गावरील सिताखंडी घाटात सतत होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत, या ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

आ. श्रीजया चव्हाण यांनी या पत्रात घाटातील तीव्र वळणे, ब्लाईंड स्पॉट्स आणि अतिवेगाने धावणारी वाहने यामुळे प्रवाशांच्या जिवाला सातत्याने मोठा धोका निर्माण होत असून, जीवितहानीच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज व्यक्त करुन काही मागण्या पोलीस प्रशासनासमोर मांडल्या आहेत. यामध्ये सर्व अपघातप्रवण क्षेत्रे आणि ब्लाईंड स्पॉट्सवर वाहनचालकांना स्पष्ट दिसतील असे धोक्याचा इशारा देणारे मोठे फलक लावणे.

तसेच धोकादायक वळणांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी रबर स्ट्रिप्स बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी घाटात स्पिड गन सुविधा असलेले कॅमेरे बसवणे आणि वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. घाटातील वाहतुकीवर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेचा हा अतिशय संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने, पोलीस प्रशासनाने याकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच वरील सर्व मागण्यांवर पोलीस अधीक्षक स्तरावरून तातडीने व योग्य ती कार्यवाही करावी, असेही आ. श्रीजया चव्हाण यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!