
राज्य सरकारचा मोठा निर्णय; खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश


नांदेड| राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रगती’ प्रकल्पाअंतर्गत नांदेड येथे आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) अर्थसाहाय्यातून ५०० खाटांचे नवीन जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी मागील दोन वर्षांपासून या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.


मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, नागरिकांना स्थानिक पातळीवर दर्जेदार व मोफत उपचार उपलब्ध करून देणे, हा या ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीचा मुख्य उद्देश आहे. या रुग्णालयाच्या प्रभावी संचालनासाठी मंजूर आकृतीबंधानुसार सर्व ५९४ पदे नव्याने निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली असून, या नवनिर्मित पदांच्या वेतनासाठी ३१.२५ कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च मंजूर करण्यात आला आहे.


याच शासन निर्णयान्वये राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचे जाळे बळकट करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ४ हजार २५० कोटी रुपये खर्चाचा ‘प्रगती’ प्रकल्प राबविला जाणार असून, यामध्ये ७० टक्के ‘एडीबी’चे कर्ज आणि ३० टक्के राज्य शासनाचे योगदान असणार आहे. या निधीपैकी १ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी प्रकल्पाअंतर्गत मंजूर आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा आणि सक्षमीकरणासाठी वापरला जाणार आहे.


माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून नांदेड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते ५०० खाटांचे करण्याचा शासन निर्णय यापूर्वीच जारी झाला होता. या प्रकल्पासाठी निधीही उपलब्ध करून द्यावा, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने प्रसिद्ध केलेल्या ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’ या घोषणापत्रातही या रुग्णालयाच्या उभारणीचे आश्वासन देण्यात आले होते.
दरम्यान, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्रीजया चव्हाण यांनी १७ मार्च २०२६ रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून ५०० खाटांच्या नवीन जिल्हा सामान्य रुग्णालयाला आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली होती. त्या लक्षवेधीला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी ‘एडीबी’अंतर्गत कामांच्या पुढील प्रस्तावात या रुग्णालयाच्या उभारणीचा समावेश केला जाईल, असे जाहीर केले होते.
नांदेड जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या निर्णयाबद्दल खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांचे आभार मानले आहेत. ही मान्यता मिळवण्यासाठी भाजपा-महायुतीतील सहकाऱ्यांचे मोठे योगदान लाभल्याचेही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
