
पिकांवर संकटाचे सावट असतानाही शेतकऱ्यांचा उत्साह कायम; मानकरी शंकर पर्वतराव पाटील यांच्या बैलजोडीची मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा
देगलूर, गंगाधर मठवाले | तालुक्यातील मौजे शहापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा पारंपरिक बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी शेतकऱ्यांनी बैलांना स्नान घालून त्यांच्या शिंगांना रगरगोटी लावली. तसेच गुळवणी व तेल पाजून बैलांची पूजा करण्यात आली.


सायंकाळी पोळ्याचे मानकरी शंकर पर्वतराव पाटील यांनी बैलजोडीसह मारोती मंदिराभोवती पाच फेऱ्या पूर्ण केल्या. यावेळी गावातील शेतकऱ्यांनी शेतीतील अडचणी आणि पिकांची चिंता काही काळ बाजूला ठेवत बैलांना आकर्षक पद्धतीने सजवून पोळा सण जल्लोषात साजरा केला.


यंदा मृग नक्षत्रापासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पिकांवर संकटाचे सावट आहे. सोयाबीन, कापूस व इतर खरीप पिकांची अवस्था चिंताजनक असतानाही वर्षातून एकदा येणाऱ्या पोळा सणाचा उत्साह शेतकऱ्यांनी कमी होऊ दिला नाही. फटाक्यांची आतषबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणात सण साजरा करण्यात आला.


सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहापूर बीटचे जमादार कनकवले व पोलीस कॉन्स्टेबल वानेरे उपस्थित होते.


