
खरीप पिके करपली; शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, पीकविमा व कर्जमाफीची मागणी
देगलूर, गंगाधर मठवाले | पावसाळा संपत आला तरी देगलूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप पिके वाळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे देगलूर व बिलोली तालुका कोरड्या दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करून शेतकरी व शेतमजुरांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी देगलूर तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.


शिवसेना मराठवाडा संपर्कप्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या आदेशानुसार, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील डक व सहसंपर्कप्रमुख दयाल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.


देगलूर तालुक्यात सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग आदी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर अपेक्षित मोठा पाऊस न झाल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळाले नाही. परिणामी अनेक भागांत पिके वाळून गेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


पेरणीसाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढले, उसनवारी केली, तर काहींनी घरातील दागिने विकून बियाणे, खते व कीडनाशके खरेदी केली. आता पिके हातची गेल्याने कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, पुढील संसार कसा चालवायचा, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.


शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नांदेड जिल्ह्यासह देगलूर व बिलोली तालुक्यांना वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती गंभीर असताना तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळणे अन्यायकारक असल्याचा आरोप शिवसेनेने केला.
आंदोलनादरम्यान तहसीलदारांना निवेदन देऊन देगलूर व बिलोली तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, शेतमजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत त्वरित कामे उपलब्ध करून द्यावीत, ग्रामीण भागातील लोडशेडिंग रद्द करावे, पीकविमा मंजूर करावा आणि यंदाच्या हंगामातील पीककर्ज माफ करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनात शिवसेना देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शहरप्रमुख भगवान जाधव, युवासेना तालुकाप्रमुख तथा शिवसेना सोशल मीडिया नेटवर्क प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, शहर संघटक मष्णाजी पैलावार, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल सोनकांबळे तडखेलकर, शहरप्रमुख विनोद सोनकांबळे, शिवाजी सोनकांबळे मुजळगेकर, शिवाजी चव्हाण, प्रकाश कांबळे यांच्यासह शेकडो शेतकरी, शेतमजूर, शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
