विद्यार्थी ११ दिवसांपासून धरण्यावर; लोकप्रतिनिधींचा पाठिंबा, प्रशासन मात्र उदासीन!

जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेविरोधात SFI-DYFIचे आंदोलन; विरोधी पक्षनेते व खासदारांची भेट, मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार

नांदेड, अनिल मादसवार | जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था दूर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी SFI व DYFI नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. मात्र, ११ दिवसांपासून विद्यार्थी आंदोलनावर ठाम असतानाही जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप ठोस भूमिका घेतली नसल्याने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरिष्ठ नेते तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या.

विद्यार्थ्यांचे प्रश्न शासनस्तरावर मांडून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. “आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

एका बाजूला लोकप्रतिनिधी आंदोलनस्थळी पोहोचून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत, तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्य दाखवले जात नसल्याचा आरोप SFI व DYFIने केला आहे.

ग्रामीण भागातील गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहराकडे धाव घ्यावी लागू नये, त्यांच्या गावातच सुरक्षित, सुसज्ज आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करून प्रशासन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

“११ दिवस झाले विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण्यावर बसले आहेत. विरोधी पक्षनेते आणि खासदार आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेत आहेत. मग जिल्हा प्रशासनाला विद्यार्थ्यांचे प्रश्न दिसत नाहीत का?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने चर्चा करून ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार SFI व DYFI नांदेड जिल्हा कमिटीने व्यक्त केला आहे.

SFI व DYFIचे पदाधिकारी मीना आरसे, जयराज गायकवाड, श्याम सरोदे, प्रकाश सरोदे, मंगेश वट्टवाड, नारायण सोनटक्के, पंढरी बोर्डे, चंद्रकांत लोखंडे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. अशी माहिती SFIच्या जिल्हा सचिव तथा संशोधक विद्यार्थीनी मीना आरसे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!