
बंद फाटक उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कर्मचाऱ्याने विरोध केल्याने काठी व दगडाने मारहाण; रेल्वे प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा
नांदेड, अनिल मादसवार | लेव्हल क्रॉसिंग फाटक क्रमांक ५३ येथे कर्तव्य बजावत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यावर अज्ञात सहा-सात जणांनी हल्ला केल्याची गंभीर घटना मध्यरात्री घडली. बंद असलेल्या रेल्वे फाटकाचा बूम उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कर्मचाऱ्याने विरोध केल्यानंतर आरोपींनी काठी व रेल्वे रुळावरील दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात कर्मचाऱ्याच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला.


दिनांक ९ व १० सप्टेंबरच्या मध्यरात्री सुमारे २.३५ वाजता, ट्रॅक मेंटेनर ओमप्रकाश गिरी हे रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत फाटक क्रमांक ५३ वर कर्तव्यावर होते. याचवेळी राज्यराणी एक्स्प्रेस (१७६११) रेल्वेगाडी जात असताना सहा-सात अज्ञात व्यक्तींनी बंद असलेल्या फाटकाचा बूम चालविण्याचा प्रयत्न केला. गिरी यांनी त्यांना रोखले असता त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.


घटनेची माहिती मिळताच आरपीएफ निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी कर्मचाऱ्याला वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी आरपीएफकडून स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने तपास सुरू आहे. एफआयआर नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.


रेल्वे कायद्यानुसार कठोर शिक्षा
रेल्वे कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा आणणे, बंद रेल्वे फाटक अनधिकृतपणे उघडणे अथवा तोडणे हे गंभीर गुन्हे असून, रेल्वे अधिनियम १९८९ मधील कलम १४६ व १६० अंतर्गत कारवाई होऊ शकते. रेल्वे प्रशासनाने नागरिकांनी रेल्वे कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, धमकी किंवा मारहाण करू नये, तसेच बंद फाटक उघडण्याचा अथवा सुरक्षा यंत्रणेशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे.


रेल्वे रुळांवर अनधिकृत प्रवेश, धोकादायक रील्स, स्टंट किंवा छायाचित्रणामुळे प्रवाशांसह स्वतःचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी रेल्वेच्या सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद किंवा असुरक्षित प्रकार आढळल्यास नागरिकांनी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर माहिती द्यावी, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
