ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ३२ गावांत उत्साहात बैलपोळा; दुष्काळाचे सावट

ढोल-ताशांच्या गजरात सर्जा-राजाची मिरवणूक; सामुदायिक विवाह सोहळे व महाआरतीने पोळा सण साजरा
नांदेड, प्रतिनिधी | ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३२ गावांमधील ३९ ठिकाणी गुरुवारी (१० सप्टेंबर) पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकरी बांधवांनी आपल्या सर्जा-राजाची आकर्षक सजावट करून हनुमान मंदिरात विधिवत पूजन, प्रदक्षिणा, आरती तसेच अनेक गावांत सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले.

तुप्पा, जवाहरनगर, भायेगाव, वाजेगाव, कांकाडी, नागापूर, राहेगाव, वांगी, पुणेगाव, वाडीपुयड, वसरणी, असरजन, वाघळा, असदवन, पिंपळगाव यासह ३२ गावांत पोळ्यानिमित्त मोठी गर्दी झाली. ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

बाभुळगावात सामुदायिक विवाह सोहळा
सामाजिक व शैक्षणिक चळवळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बाभुळगाव येथे सायंकाळी पाच वाजता सामुदायिक बैलजोडी विवाह सोहळा झाला. शेतकऱ्यांनी सजविलेल्या बैलजोड्यांना हनुमान मंदिरात नेऊन प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात महाआरती व विवाह सोहळा पार पडला. मानकरी संभाजी पांचाळ यांच्या हस्ते तोरण तोडण्यात आले. यावेळी सरपंच पुंडलिक मस्के, तंटामुक्त अध्यक्ष सूर्यभान पाटील मोरे, प्रभाकर पाटील मोरे, अशोक मोरे, काळेश्वर मस्के, बालाजी पाटील मस्के, आनंदराव मस्के, पोलीस पाटील संतोष मोरे, मधुकर मस्के, सेवानिवृत्त शिक्षक एस.बी. मोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

भायेगाव, पांगरी, राहेगावातही उत्साह
भायेगाव येथे हनुमान मंदिरात बैलजोड्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. तोरण तोडण्याचा मान शामराव पाटील खोसडे मुकदम यांना देण्यात आला. सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर, अशोक पाटील कोचार, उपसरपंच बालाजी कोल्हे, विठ्ठल पाटील खोसडे, पोलीस पाटील प्रतिनिधी शिवानंद खोसडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पांगरी येथे २० बैलजोड्यांचा सामुदायिक विवाह व महाआरती करण्यात आली. राहेगावातही हनुमान मंदिरात ढोल-ताशांच्या गजरात बैलजोड्यांचे पूजन करण्यात आले. जवाहरनगर-तुप्पा येथे मिरवणुकीसह सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.

पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांत पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी पोलीस पाटलांना आवश्यक सूचना दिल्याने पोळा सण शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. दरम्यान, गेल्या ४० ते ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक गावांतील शेतकरी चिंतेत असून, हिरव्यागार सणावरही दुष्काळाचे सावट स्पष्टपणे जाणवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!