
निझामाबाद /नांदेड| पत्रकारिता, जनसंज्ञापन, निवेदक (Anchor) तसेच इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करणाऱ्या प्रतिष्ठित पुरस्काराने पत्रकार श्री. अमृतजी गोजे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या निष्णात पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी, पारदर्शक भूमिका आणि प्रभावी निवेदकीय शैलीची दखल घेत त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.


समाजात सकारात्मकता, नैतिक मूल्ये आणि आध्यात्मिक विचारांचा प्रसार करणाऱ्या निष्कलंक व उत्कृष्ट पत्रकारांच्या कार्याचा गौरव करणे, हा या पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे. ब्रह्माकुमारी संस्थेच्या माउंट आबू येथील ‘शांतिवन’ किंवा ‘ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’ परिसरात आयोजित विशेष राष्ट्रीय संमेलनांमध्ये देश-विदेशातील मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.


पत्रकारिता क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान देताना अमृतजी गोजे यांनी सामाजिक प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली. तसेच निवेदक म्हणून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


अमृतजी गोजे यांच्या या सन्मानामुळे मित्रपरिवार, सहकारी आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाळेतील दहावी १९८७ च्या बॅचमधील सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.


