
कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार व डॉ. शैलेश वाढेर यांना राज्यस्तरीय सन्मान; विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने’ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील दोन वरिष्ठ प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला आहे.


वर्ष २०२४-२५ साठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, तर वर्ष २०२५-२६ साठी नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठ परिसरात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राध्यापकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे आहे.


डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी विद्यापीठ कार्यक्षेत्रात प्रशासकीय गतिशीलता व पारदर्शकता, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम तसेच शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तर डॉ. शैलेश वाढेर यांनी नवोपक्रम, नवसंशोधन, संशोधन संस्कृतीचा विकास आणि विविध शैक्षणिक भागीदारींना चालना देण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची राज्य शासनाने घेतलेली दखल ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.



हा पुरस्कार महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि कला शिक्षण संचालक डॉ. किशोर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


या उल्लेखनीय यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी दोन्ही पुरस्कारप्राप्त प्राध्यापकांचे अभिनंदन केले. व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व अधिसभेचे सदस्य, प्राध्यापक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

सलग दोन वर्षे राज्य शिक्षक पुरस्कार मिळणे विद्यापीठासाठी अभिमानाची बाब
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाला वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ अशा सलग दोन वर्षांसाठी डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार मिळणे ही समाधानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सन्मानामुळे विद्यापीठाचा शैक्षणिक क्षेत्रातील बहुमान आणखी उंचावला आहे.
पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि डॉ. शैलेश वाढेर यांनी हा सन्मान विद्यार्थी, सहकारी आणि समाजाला समर्पित असल्याचे सांगितले. नियमित अध्यापन, संशोधन आणि विद्यापीठाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करणे हीच आपली खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही प्राध्यापकांना मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेला बळ देणारा असून, उच्च शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी कार्यरत प्राध्यापकांना निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
