दावे-हरकतींची अचूक पडताळणी करा; पात्र मतदार वंचित राहू नये — जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

विशेष सखोल पुनरिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात मतदार यादी शुद्धीकरणाला वेग; अधिकारी, बीएलओंना प्रशिक्षण
नांदेड,अनिल मादसवार| विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला जिल्ह्यात सुरुवात झाली असून, या टप्प्यात प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींची काटेकोरपणे पडताळणी करून नियमानुसार तातडीने निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

“एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहणार नाही आणि अपात्र मतदार मतदार यादीत राहणार नाही,” याची दक्षता घेत मतदार यादी अधिकाधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाबाबत जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मार्गदर्शन करत होते. सहायक जिल्हाधिकारी बी. सरवनन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हणमंत कोळेकर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी कर्डिले यांनी संबंधित अधिकारी, पर्यवेक्षक आणि बीएलओंचे अभिनंदन केले. जुन्या मतदार यादीतून एखादा पात्र मतदार चुकीने वगळला गेला असल्यास संबंधित मतदाराकडून फॉर्म क्रमांक ६ भरून घेऊन त्याची योग्य पडताळणी करावी व नियमानुसार निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

बीएलओच्या पंचनाम्याच्या आधारे अनेक त्रुटींची दुरुस्ती करता येऊ शकते. संबंधित मतदारांना व्हॉट्सॲपद्वारे किंवा प्रत्यक्ष नोटीस देऊन आवश्यकतेनुसार सुनावणी घ्यावी. दावे व हरकतींच्या सुनावणीदरम्यान प्रत्येक प्रकरणाची काळजीपूर्वक तपासणी करून निर्धारित वेळेत कार्यवाही पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फॉर्म क्रमांक ७ आणि ८ बाबत निर्णय घेताना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देत सहायक मतदार नोंदणी अधिकारीनिहाय सुनावणीचे अचूक नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच संबंधित अधिकारी, पर्यवेक्षक आणि बीएलओंना आवश्यक प्रशिक्षण देण्याबरोबरच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही या प्रक्रियेची माहिती देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. पुनरिक्षणाच्या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता किंवा गंभीर स्वरूपाची चूक आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि आवश्यकतेनुसार एफआयआर दाखल करावा, असा इशाराही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिला.

नवीन मतदार नोंदणीवरही विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांची माहिती घेऊन त्यांच्याकडून फॉर्म क्रमांक ६ भरून घ्यावा. क्षेत्रीय पातळीवर प्रभावी नियोजन करून कामाची गती वाढविताना संपूर्ण प्रक्रियेत अचूकता व पारदर्शकता राखावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) हणमंत कोळेकर यांनी दुसऱ्या टप्प्यातील कामकाज, दावे-हरकती स्वीकारणे, त्यांची पडताळणी, आवश्यकतेनुसार सुनावणी घेणे आणि नियमानुसार निपटारा करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचेही निरसन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार आणि संबंधित अधिकारी प्रशिक्षणास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!