
सरसकट कर्जमाफी करा, कोरडा दुष्काळ जाहीर करून एकरी किमान ५० हजारांची तातडीची मदत द्या; अन्यथा तहसीलवर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा — माजी खासदार सुभाष वानखेडे
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| आभाळाने पाठ फिरवली, पिके करपून डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहेत, शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला आहे; मात्र एवढे मोठे संकट बळीराजावर कोसळले असताना शासन आणि प्रशासन मात्र वातानुकूलित कार्यालयात बसून तमाशा पाहत आहे का? असा संतप्त सवाल हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.


कोरड्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना सरकारने तातडीने दखल घेऊन सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, जाचक निकष रद्द करावेत आणि एकरी किमान ५० हजार रुपयांची मदत त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केली. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयावर भव्य रूमने मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी ALM Bharat शी बोलतांना दिला.


हिमायतनगर तहसील कार्यालयावर पक्ष, झेंडे आणि राजकारण बाजूला ठेवून हजारो शेतकरी एकत्र आले होते. कोरड्या दुष्काळाची भीषणता शासनाच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी देण्यात आलेल्या निवेदनावेळी वानखेडे बोलत होते.


पिके वाळताहेत, सरकारला दिसत नाही का?
तालुक्यातील तूर, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, हळद आणि उभा ऊस पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आता पूर्णतः हतबल झाला आहे. पिके वाचविण्यासाठी पाण्याची धडपड, विजेचा लपंडाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.



“शेतकरी जगला तर देश जगेल,” हे केवळ भाषणात सांगण्यापेक्षा आता प्रत्यक्ष मदतीची वेळ आली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बसून कागदोपत्री अहवाल देण्याऐवजी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन बळीराजाची विदारक परिस्थिती पाहावी, अशी मागणी करण्यात आली.
महावितरणचा लपंडाव बंद करा!
दुष्काळी परिस्थितीत शेतीला पाणी देण्यासाठी वीज अत्यावश्यक असताना महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची आणखी कोंडी होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विजेचा लपंडाव आणि मनमानी कारभार तातडीने बंद करून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
“अधिकाऱ्यांवर वचक नाही, मग निवडून देऊन फायदा काय?”
तहसील, पंचायत समिती, महावितरण, भूमिअभिलेख आणि रजिस्ट्री कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना साध्या कामांसाठीही वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. “अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक नसेल आणि सामान्य माणसाला प्रत्येक कामासाठी चपला झिजवाव्या लागत असतील, तर लोकप्रतिनिधींना निवडून देऊन आम्हाला फायदा काय?” असा थेट आणि कडक सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

सरकारने आता तरी जागे व्हावे — माधवराव पाटील जवळगावकर
माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनीही शासनाच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला जाचक अटी लावून त्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. हक्काचा पीकविमा मिळणेही दुरापास्त झाले असून, हिमायतनगर तालुक्यात विविध विभागांच्या कारभारात मोठा गोंधळ असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न बाजूला सारून चालणार नाहीत. नुकसान लक्षात घेऊन सरसकट मदत द्यावी आणि हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत मदतीचा विचार करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावा, अशी मागणी जवळगावकर यांनी केली.
यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, हिमायतनगरचे नगराध्यक्ष शेख रफिक भाई, वामनराव पाटील वडगावकर, कल्याण पाटील पळसपुरकर, दत्ता पाटील सोनारीकर, विशाल राठोड, प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि हिमायतनगर तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले.
