
भगवे वस्त्र, हातात कावड अन् ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने हिमायतनगर दुमदुमले; आई-वडिलांचे चरणस्पर्श करून घेतला आशीर्वाद


हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| श्रावणातील धार्मिक परंपरेचा जागर करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पुढाकारातून यंदाही बाणगंगा सहस्रकुंड महादेव मंदिर ते वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिर अशी भव्य कावड यात्रा काढण्यात आली. भगवे वस्त्र परिधान केलेल्या युवकांनी खांद्यावर कावड घेऊन भक्तिभावाने पदयात्रा पूर्ण केली. हिमायतनगर शहरात कावड यात्रा दाखल होताच नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.


गेल्या अनेक वर्षांपासून ही कावड यात्रा धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून आयोजित केली जाते. सहस्रकुंड येथील बाणगंगा महादेव मंदिरातून पवित्र जल घेऊन कावडधारी युवक पदयात्रेद्वारे वाढोणा शहरातील श्री परमेश्वर मंदिराकडे मार्गक्रमण करतात. यंदाही मोठ्या उत्साहात कावड यात्रा पार पडली.


यात्रेदरम्यान इस्लापूर, वडगाव आणि हिमायतनगरसह मार्गावरील विविध ठिकाणी कावडधाऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाविकांसाठी फराळ, पाणी आदींची व्यवस्था करण्यात आली होती. हिमायतनगर शहरात कावड यात्रा दाखल होताच पुष्पवृष्टी करून भाविकांचे स्वागत करण्यात आले.


राष्ट्रीय महामार्गावरून शहरात दाखल झालेली कावड यात्रा मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करत श्री परमेश्वर मंदिरात पोहोचली. मंदिरात पोहोचल्यानंतर कावडधारी युवकांनी सहस्रकुंड येथून आणलेल्या पवित्र जलाने जागृत देवस्थान श्री परमेश्वराचा जलाभिषेक केला. यावेळी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
कावड यात्रेदरम्यान युवकांनी आपल्या आई-वडिलांचे चरण धुऊन त्यांना नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. धार्मिक श्रद्धेसोबतच आई-वडिलांप्रती कृतज्ञता आणि संस्कारांचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
‘हर हर महादेव… बम बम भोले… जय श्रीराम…’ अशा जयघोषांनी संपूर्ण हिमायतनगर शहर दुमदुमून गेले होते. भगव्या पताका आणि भक्तिमय घोषणांमुळे शहरातील वातावरण धार्मिक उत्साहाने भारून गेले होते.
कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच नवयुवक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
