अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी १३ सप्टेंबरला नांदेडमध्ये जनआक्रोश महामोर्चा

मातंग समाजासह लाभवंचित जातींचा सहभाग; जिल्ह्यातील जनसंवाद बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड| अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समतोलपणे पोहोचवावा, या मागणीसाठी १३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे. लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता महामोर्चाला सुरुवात होणार असून, मातंग समाजासह अनुसूचित जातीतील लाभवंचित समाजघटक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी महत्त्वपूर्ण निर्णय देत राज्यांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात उपवर्गीकरणाचा मार्ग खुला केला आहे. त्यानंतर विविध राज्यांनी याबाबत निर्णय घेतला असताना महाराष्ट्रात अद्याप उपवर्गीकरणाचा निर्णय प्रलंबित असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

महामोर्चाच्या तयारीसाठी सकल मातंग समाज व अनुसूचित जातीतील लाभवंचित समाजघटकांची आयोजन समिती स्थापन करण्यात आली असून, जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. मुखेड, माहूर, हदगाव, बारड, उमरखेड, डोंगरगाव, उमरी, धर्माबाद, देगलूर आणि नायगाव येथे जनसंवाद बैठका घेण्यात आल्या. या बैठकांना समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा समितीने केला आहे.

आयोजकांच्या मागणीनुसार महाराष्ट्रातील अतिमागास व लाभवंचित ४४ अनुसूचित जातींचा ‘अ’ गट आणि प्रगत १५ जातींचा ‘ब’ गट तयार करून उपवर्गीकरण करावे. तसेच संबंधित जातसमूहांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाच्या आधारे दोन्ही गटांची आरक्षणाची टक्केवारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील सर्व घटकांपर्यंत समतोलपणे पोहोचावा, लाभवंचित समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे आणि संविधानातील सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात यावी, या उद्देशाने महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले.

‘नांदेडच्या भूमीतून रणशिंग’
नांदेड हा मातंग समाजाच्या सामाजिक चळवळीतील महत्त्वाचा जिल्हा असल्याचे सांगत, याच भूमीतून आरक्षण उपवर्गीकरणासाठी सरकारचे लक्ष वेधले जाईल, असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने तातडीने उपवर्गीकरणाचा निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी महामोर्चातून करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेला आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार अविनाश घाटे, मारुती वाडेकर, केशव शेकापूरकर, लालबाजी घाटे, प्रितम गवाले, गणेश तादलापूरकर, गंगाधर कावडे, सतीश कावडे, भारत सरोदे यांच्यासह आयोजन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महामोर्चात नांदेड जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील मातंग समाज तसेच लाभवंचित अनुसूचित जातींच्या बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!