नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी एक लाखांची मदत द्या

संभाजी ब्रिगेडचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नांदेड|  नांदेड जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, तसेच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांना देण्यात आले.

संभाजी ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार, नांदेड जिल्ह्यात गतवर्षी आजपर्यंत ८२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र केवळ ५२१ मिलिमीटर पाऊस झाला असून गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३०५ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. पावसाच्या या तुटीचा थेट परिणाम खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या सोयाबीनमध्ये शेंगा भरण्याचा, तर कापसाला बोंड येण्याचा महत्त्वाचा कालावधी आहे. या अवस्थेत जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक असताना कडक उन्हामुळे पिके वाळू लागली आहेत.

भारतीय हवामान विभागाने गेल्या महिन्यात दोन वेळा यलो अलर्ट जारी केला होता. मात्र, अलर्टच्या कालावधीत अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी कायम राहिल्या आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटण्यासह उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, जिल्हाध्यक्ष कमलेश कदम, लोकसभा अध्यक्ष परमेश्वर पाटील, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप गुब्रे, किरण वानखेडे, कुंडलिक शिंदे, रमेश बोकारे, नितीन कोकाटे, दिलीप दळवी, प्रदीप इंगोले, बालाजी पाटील, प्रेमानंद खिलारे, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!