पावसाच्या खंडात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अष्टसूत्री उपाययोजना राबवावी

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचे आवाहन; सोयाबीन, मूग, उडीद पिकांवर परिणाम, कपाशी व तुरीलाही पाण्याच्या ताणाचा धोका
नांदेड| ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने दडी मारल्याने नांदेड जिल्ह्यातील हलक्या मुरमाड व माळरानाच्या जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे सोयाबीन, मूग आणि उडीद या कमी कालावधीच्या पिकांना फटका बसला असून, कपाशी व तूर या दीर्घ कालावधीच्या पिकांवरही पाण्याच्या ताणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अष्टसूत्री उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

पिके व जमिनीतील ओलाव्याचे निरीक्षण : पिकांची वाढीची अवस्था आणि जमिनीतील उपलब्ध ओलावा याचे नियमित निरीक्षण करून त्यानुसार व्यवस्थापन करावे.

संरक्षित सिंचनाला प्राधान्य : उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचन द्यावे. त्यामुळे पिकांना पाण्याच्या ताणापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
जलसंधारणावर भर : कपाशी व तूर पिकांमध्ये जलसंधारणाच्या सरी काढून भविष्यातील पावसाचा प्रत्येक थेंब शेतात अडवून जमिनीत मुरविण्याचे नियोजन करावे.
तण नियंत्रण : तणांमुळे पिकांसाठी उपलब्ध ओलावा व अन्नद्रव्यांचा वापर होत असल्याने पावसाच्या खंड काळात तण नियंत्रण करणे आवश्यक आहे.

आंतरमशागती : आंतरमशागती करून जमिनीतील भेगा बुजवाव्यात. यामुळे ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकविण्यास मदत होते.
कीड-रोगांचे निरीक्षण : पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.
आच्छादनाचा वापर : उपलब्ध साधनांनुसार जमिनीवर योग्य प्रकारचे आच्छादन केल्यास जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.

अन्नद्रव्यांची फवारणी : पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पोटॅशियम नायट्रेट १ ते २ टक्के तसेच ००:५०:३४ एक टक्का या अन्नद्रव्यांची दर ८ ते १० दिवसांनी फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच बायो एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर केल्यास पिकांची जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते.

पावसाच्या खंड काळात उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, जमिनीतील ओलावा संवर्धन आणि पिकांच्या गरजेनुसार व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वरील अष्टसूत्री उपाययोजनांचा अवलंब करून पिकांचे संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!