नांदेड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरे

महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन; तलाठी, ग्रामसेवक व मंडळ अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाकडून नोंदी व कागदपत्रांची पडताळणी
नांदेड| जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे, यासाठी १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, तिच्या अंमलबजावणीत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.

या शिबिरांसाठी प्रत्येक महसूल मंडळात तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांचे संयुक्त पथक कार्यरत राहणार आहे. जुन्या कुणबी नोंदी शोधणे, नागरिकांनी सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी करणे, नवीन अर्ज स्वीकारणे तसेच आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून परिपूर्ण अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शिबिरांची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचावी यासाठी गावपातळीवर दवंडी देणे, ग्रामपंचायतीच्या नोटीस फलकावर सूचना लावणे आणि स्थानिक व्हॉट्सॲप समूहांद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र जलदगतीने मिळावे, यासाठी शिबिरांमध्ये आवश्यक कार्यवाही करून पुढील पाठपुरावाही करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि गतिमानता राखण्यासाठी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांची जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिबिरांच्या कामकाजाचे दैनिक संनियंत्रण त्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.

ही मोहीम शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याने सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर सूक्ष्म नियोजन करून आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी आपल्या क्षेत्रातील महसूल मंडळ स्तरावर आयोजित विशेष शिबिराला भेट देऊन या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!