
२५ गावांसाठी बँकिंग सुविधा उपलब्ध होणार; खासदार अजित गोपछडे यांना निवेदन
देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील शहापूर हे परिसरातील महत्त्वाचे उपबाजारपेठेचे गाव असून, गावाशी जवळपास २० ते २५ खेड्यांचा थेट संपर्क आहे. मात्र, गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नसल्याने नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहारांसाठी तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे शहापूर येथे भारतीय स्टेट बँकेची (SBI) शाखा तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


या मागणीसंदर्भात अधिवक्ता श्रीकांत कोपले आणि भाजपाचे सोशल मीडिया तालुकाप्रमुख संजय पांचाळ यांनी खासदार डॉ. अजित गोपछडे यांना निवेदन देऊन बँक शाखा स्थापन करण्याची मागणी केली.


शहापूरची लोकसंख्या सुमारे दहा हजारांहून अधिक असून, गावात सात-आठ आडत व्यापारी, पाच-सहा सराफा व्यावसायिक, ५० पेक्षा अधिक किराणा दुकाने तसेच सात-आठ कापड दुकाने आहेत. याशिवाय परिसरातील २० ते २५ गावांतील नागरिक विविध खरेदी-विक्री तसेच आर्थिक व्यवहारांसाठी शहापूरला येतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर बँकिंग व्यवहाराची गरज निर्माण झाली आहे.


सध्या शहापूरमध्ये आयडीबीआय बँक आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, ग्रामीण भागातील बँक शाखांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता, मर्यादित सेवा आणि विविध कामांसाठी होणारी गर्दी यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः व्यापारी, शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना कर्ज, गोल्ड लोन, रोख व्यवहार, डिजिटल बँकिंग तसेच इतर आर्थिक सेवांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.


शहापूर येथे एसबीआयची शाखा सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना आधुनिक बँकिंग सुविधा गावातच उपलब्ध होतील. तसेच शेतकरी व व्यावसायिकांना कर्ज सुविधा मिळून नवीन व्यवसाय सुरू करण्यास आणि विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत होईल. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही वाढतील.
या सर्व बाबींचा विचार करून शासन व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहापूरच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन भारतीय स्टेट बँकेची शाखा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी श्रीकांत कोपले व संजय पांचाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
