देगलूरमध्ये कडकडीत बंद; जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सकल मराठा समाजाचा एल्गार

देगलूर, गंगाधर मठवाले| मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने देगलूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी, व्यावसायिक, युवक आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने दिवसभर बंद राहिल्याने नेहमी गजबजणाऱ्या देगलूर शहरात शुकशुकाट दिसून आला.

मराठा समाजाच्या आरक्षणासह कुणबी नोंदी, जात प्रमाणपत्रे आणि अन्य प्रलंबित मागण्यांवर शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. शासनाचे लक्ष या मागण्यांकडे वेधण्यासाठी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला.

बंददरम्यान सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवला. अंतरवाली सराटी येथील आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा आणि मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस प्रशिक्षणार्थी डीवायएसपी वैभव पडवळ यांच्या उपस्थितीत विविध चौक व प्रमुख ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बंद शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली.

देगलूरच्या कडकडीत बंदमधून मराठा समाजाची एकजूट आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला असलेला व्यापक पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला. शासनाने आता मागण्यांकडे गांभीर्याने पाहून ठोस भूमिका घ्यावी, अशी भावना समाजबांधवांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!