पीपल्स हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील संधींचे मार्गदर्शन

नांदेड, प्रतिनिधी| हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स हायस्कूल, नांदेडच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रती आवड निर्माण व्हावी तसेच खेळातून मिळणाऱ्या विविध संधींची माहिती व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नौनिहाल सिंघ जहागीरदार होते. पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य सुकाळे सर यांची विशेष उपस्थिती होती. नांदेडचे प्रसिद्ध हॉकीपटू प्रा. डॉ. सरदार जुझारसिंग सिलेदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सिलेदार यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व तसेच क्रीडा क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या विविध संधींची माहिती दिली. स्पर्धात्मक क्रीडेत उत्कृष्ट कामगिरी करून देशाचे नाव उंचावता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ मोबदल्याचा विचार न करता मेहनत, शिस्त, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात आपले स्थान निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले. विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्राबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

प्राचार्य सुकाळे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षणासोबतच खेळालाही महत्त्व देण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप करताना नौनिहाल सिंघ जहागीरदार यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले. यावेळी सौ. बच्चेवार आणि श्रीमती कंधारे यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात आवटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालेपवाड यांनी केले, तर फुलारी यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!