शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटणार : गुणवंत पाटील हंगरगेकर

जन्मदिनानिमित्त विशेष अंकाचे विमोचन; शेतकरी, बाजारव्यवस्था आणि सामाजिक वास्तवावर परखड भाष्य

नांदेड, प्रतिनिधी| “शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी माझ्या कुवतीप्रमाणे आणि क्षमतेनुसार झिजता आले, याचे समाधान आहे. अन्नदात्या पोशिंद्याचे जीवन अधिक समृद्ध, सन्मानपूर्ण आणि स्वाभिमानी व्हावे, यासाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत झटण्याचा माझा संकल्प आहे,” असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी केले.

त्यांच्या जन्मदिनानिमित्त नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात एका दैनिकाच्या विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी रामेश्वर बद्दर, डॉ. पाटील, गोविंद मुंडकर आणि बालाजी वैजळे यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी बोलताना हंगरगेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले. शेतकरी हा केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेचा घटक नसून संपूर्ण समाजव्यवस्थेचा पोशिंदा आहे. त्याच्या श्रमावर समाजाचे जीवनचक्र अवलंबून असतानाही त्याच्या कष्टाला अपेक्षित प्रतिष्ठा, योग्य मोबदला आणि आर्थिक स्थैर्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ राजकीय किंवा तात्कालिक दृष्टिकोनातून न पाहता त्यामागील आर्थिक, सामाजिक आणि बाजारव्यवस्थेचा सखोल विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या बाजारव्यवस्थेत शेतकऱ्याने केवळ उत्पादन करणारा घटक न राहता बाजारपेठ, व्यापार, मूल्यसाखळी आणि आर्थिक निर्णयप्रक्रिया समजून घेणारा सजग घटक बनले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“निकोप स्वार्थ असलाच पाहिजे,” असे सांगताना हंगरगेकर म्हणाले की, स्वतःची प्रगती करण्याची इच्छा आणि आपले जीवन अधिक चांगले करण्याची धडपड यात गैर काहीच नाही. निकोप स्वार्थ आणि निरोगी स्पर्धा व्यक्ती, समाज आणि अर्थव्यवस्थेला पुढे नेण्याचे काम करतात. मात्र स्वार्थाला विवेकाची आणि स्पर्धेला मूल्यांची जोड असणे गरजेचे आहे.

दुसऱ्याच्या हक्कावर डल्ला मारून किंवा इतरांचे नुकसान करून स्वतःचा फायदा करून घेणारी प्रवृत्ती समाजासाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले. “आपली प्रगती व्हावी; मात्र त्यासाठी दुसऱ्याचा विनाश व्हावा, ही मानसिकता कोणत्याही अर्थाने हितावह नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळवून देण्यासाठी केवळ घोषणा पुरेशा नसून धोरण, बाजारपेठ आणि प्रत्यक्ष व्यवहार यांची सांगड घालणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला उत्पादनाची योग्य किंमत, निर्णयस्वातंत्र्य आणि आर्थिक सुरक्षितता मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हंगरगेकर यांच्या विचारांमध्ये शेतकऱ्यांविषयीची आस्था, सामाजिक वास्तवाचे भान आणि परिवर्तनाची तळमळ दिसून येते. पोशिंद्याच्या उत्कर्षासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचा त्यांचा निर्धार उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमातील मान्यवरांनी गुणवंत पाटील हंगरगेकर यांच्या सामाजिक व वैचारिक योगदानाचा गौरव करून त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!