
ढोल-ताशांचा गजर अन् लेझीमच्या तालावर चिमुकल्यांचे लक्षवेधी सादरीकरण
हिमायतनगर, प्रतिनिधी| लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हिमायतनगर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.


शोभायात्रेदरम्यान चिमुकल्या शालेय विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा निनाद आणि लेझीमच्या तालामुळे शहरातील वातावरण अण्णाभाऊ साठे जयंतीच्या उत्साहाने भारावून गेले होते. नागरिकांनीही या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


शोभायात्रेत सहभागी नागरिकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या सामाजिक आणि साहित्यिक कार्याचे स्मरण केले. ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.



जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी श्यामकुमार मसाजी बनसोडे, बालाजी प्रकाश बनसोडे, अजय पंडितराव बनसोडे, विकास आनंदराव मनपुरे, गजानन रंगराव बनसोडे, कुणाल वाघमारे यांच्यासह अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, हिमायतनगरचे पदाधिकारी, महिला-पुरुष नागरिक आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्साहपूर्ण वातावरणात जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
