कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाची दडी; शहापूर परिसरात सोयाबीनला तुषार सिंचनाचा आधार

देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाचे असमान वितरण अनुभवायला मिळत असून, शहापूर परिसरातील काही शिवारांत अतिपावसामुळे पिके पिवळी पडत आहेत, तर काही भागात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपू लागली आहेत. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना आता बोअरवेलचा आधार घेत तुषार सिंचनाद्वारे सोयाबीनला पाणी देण्याची वेळ आली आहे.

शहापूर परिसरात यंदा प्रथमच शेतकऱ्यांना अक्षरशः ‘ऊन-सावलीचा खेळ’ अनुभवायला मिळत आहे. आलूर, कोटेकलूर, लिंबा, शेवाळा, करेमलकापूर आदी शिवारांत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आजही शेतात वापसा झालेला नाही. परिणामी काही ठिकाणी खरीप पिके पिवळी पडू लागली आहेत. याउलट सुडगी, सुडगी फाटा, नरगल, मडगी, चैनपूर आदी शिवारांत अपेक्षित पाऊस न झाल्याने सोयाबीनची पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत.

शेतकऱ्यांनी छोट्या-मोठ्या पावसाच्या भरवशावर सोयाबीनची लागवड केली. पिकाच्या सुरुवातीपासून कोळपणी, फवारणी, निंदणी यासह विविध मशागती करून प्रति एकर सुमारे १५ ते २० हजार रुपये खर्च केला आहे. मात्र आता सोयाबीनची काढणी व राशीला अजून जवळपास दीड महिन्याचा कालावधी असताना पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पिके हातची जाऊ नयेत म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतातील बोअरवेल सुरू करून तुषार सिंचनाच्या माध्यमातून सोयाबीनला पाणी देण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी होत असून, पिकाला जीवदान देण्यासाठी शेतकरी अक्षरशः धडपड करत आहेत.

कधी आसमानी, तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर यंदाही हवामानाच्या लहरीपणाचे नवे आव्हान उभे राहिले आहे. कुठे अतिपाऊस तर कुठे पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असताना, मोठा खर्च करून उभे केलेले पीक वाचविण्यासाठी शेतकरी कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न करत असल्याचे चित्र शहापूर परिसरात पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!