युवा सेनेतर्फे देगलूरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर; २०० जणांची तपासणी, १०० जणांना चष्मे वाटप

देगलूर, गंगाधर मठवाले| युवा सेना शहरप्रमुख विनोद लक्ष्मणराव सोनकांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत युवा सेनेच्या वतीने देगलूर येथे मोफत नेत्ररोग, दंतरोग तसेच नाक-कान-घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

श्री संत रविदास महाराज सभागृहात आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २०० नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर जवळपास १०० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

गोरगरीब, दिनदलित, वृद्ध माता-भगिनी व गरजू नागरिकांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आणि पूजा आहे, या भावनेतून युवा सेना तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख राहुल सोनकांबळे तडखेलकर मित्रमंडळाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन श्री संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आले. यावेळी देगलूर येथील सुप्रसिद्ध मंतावार हॉस्पिटलचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मंतावार, डॉ. सौ. प्रियंका गुर्जर तसेच एकदंत हॉस्पिटलचे दंतरोग तज्ज्ञ डॉ. मुकेश शिवाजीराव पाटील गवंडगावकर यांनी नागरिकांची मोफत तपासणी केली. तपासणीनंतर गरज असलेल्या नागरिकांना मोफत चष्मेही वितरित करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, देगलूर शिवसेना शहर संघटक मष्णाजी पैलावार, युवा सेना शहर समन्वयक संतोष कांबळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख राहुल सोनकांबळे तडखेलकर, युवा सेना शहरप्रमुख विनोद सोनकांबळे यांच्यासह राहुल सोनकांबळे मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, नेत्र, कान, नाक, घसा व दातांची नियमित तपासणी करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, आजाराची लक्षणे जाणवल्यानंतर उपचार करण्यापेक्षा वेळेवर तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे, असे महेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

या सामाजिक उपक्रमामुळे गरजू नागरिकांना आरोग्य तपासणी व चष्म्यांचा लाभ मिळाल्याने युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!