
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या कार्याला उजाळा; विविध खेळांची विद्यार्थ्यांना माहिती
हिमायतनगर, प्रतिनिधी| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रभारी क्रीडा संचालिका डॉ. शेख शहेनाज, स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम. पी. गुंडाळे, डॉ. एल. बी. डोंगरे, प्रा. महेश वाखरडकर आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या प्रसंगी प्रभारी क्रीडा संचालिका डॉ. शेख शहेनाज यांनी विद्यार्थ्यांना हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बेसबॉल आणि फुटबॉल आदी विविध खेळांची माहिती दिली. तसेच हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा कारकिर्दीवर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. ध्यानचंद यांना हॉकीचे ‘जादूगार’ म्हणून ओळखले जाते, असे सांगत त्यांनी त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व विशद केले.


क्रीडा क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत विविध क्रीडा प्रकारांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल राजू बोंबले यांनी केले, तर डॉ. श्याम इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी उत्साह निर्माण झाला.


