देगलूर महाविद्यालयाचा भार्गव येरमल्ली बनला सूर्यसेवा ग्रीन एनर्जीचा संचालक

वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी मिळविले यश; २१ पैकी २१ मते मिळवत निवडणूक एकतर्फी जिंकली
देगलूर, गंगाधर मठवाले | अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभागाला महाराष्ट्र राज्यस्तरावर विशेष बहुमान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्टा योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सूर्यसेवा ग्रीन एनर्जी प्रा. लि. या सौरऊर्जा क्षेत्रातील कंपनीच्या संचालकपदी देगलूर महाविद्यालयातील बी.कॉम. तृतीय वर्षाचा विद्यार्थी भार्गव श्रीपाद येरमल्ली यांची वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी निवड झाली आहे.
विशेष म्हणजे, कंपनीच्या एकूण २१ संस्थापक सदस्यांपैकी सर्व २१ मते भार्गव यांच्या बाजूने पडली. त्यामुळे त्यांनी संचालकपदाची निवडणूक एकतर्फी पद्धतीने जिंकत आपल्या नेतृत्वगुणांची प्रभावी छाप उमटविली.

भार्गव येरमल्ली यांनी यापूर्वी करिअर कट्ट्यामध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. या काळात त्यांनी दाखविलेली कर्तव्यनिष्ठा, कार्यक्षमता, प्रभावी संवादकौशल्य आणि नेतृत्वगुण यामुळे त्यांच्यावर कंपनीच्या संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सौरऊर्जेच्या क्षेत्रात काम करण्याचा मानस
सूर्यसेवा ग्रीन एनर्जी प्रा. लि. ही कंपनी सौरऊर्जेच्या विविध क्षेत्रांत काम करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे. घरगुती सौरऊर्जा प्रकल्प, सौर कृषी पंप, तसेच सौरऊर्जेवर चालणारी विविध उपकरणे व सेवा यावर कंपनीकडून काम केले जाणार आहे.
भविष्यात सौरऊर्जेच्या क्षेत्रातील विविध संधींचा विस्तार करून अधिकाधिक नागरिक, शेतकरी आणि संस्थांना स्वच्छ व शाश्वत ऊर्जेच्या पर्यायांशी जोडण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

विद्यार्थ्यांना उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव
करिअर कट्टा उपक्रमांतर्गत कंपनी स्थापन करण्यामागे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कंपनी कशी स्थापन केली जाते, तिचे व्यवस्थापन कसे केले जाते, निर्णयप्रक्रिया, नेतृत्व, व्यवसाय नियोजन आणि उद्योग क्षेत्रातील कामकाज याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा महत्त्वाचा उद्देश आहे.

विद्यार्थ्यांना केवळ नोकरी शोधणारे न बनवता भविष्यात रोजगार निर्माण करणारे उद्योजक म्हणून घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमातून देगलूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

भार्गव येरमल्ली यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार तसेच कार्यकारिणी मंडळाचे सदस्य सूर्यकांत नारलावार, देवेंद्र मोतेवार, गंगाधरराव जोशी, रवींद्रअप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर यांनी अभिनंदन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, डॉ. एम. एम. चमकुडे, डॉ. व्ही. जी. शेरीकर, पर्यवेक्षक संग्राम पाटील, प्रा. माधव चोले, प्रा. सुरेश काशीदे, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी भार्गव येरमल्ली यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अवघ्या २१व्या वर्षी २१ पैकी २१ मते मिळवत संचालकपदाची जबाबदारी मिळविणारा भार्गव येरमल्ली यांचा हा यशस्वी प्रवास देगलूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!