
रामदास पाटील सुमठणकर यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा; प्रशासनाच्या आश्वासनाकडे ग्रामस्थांचे लक्ष
देगलूर, गंगाधर मठवाले| निपाणी सावरगाव येथील स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठणकर यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न प्रशासनाच्या पातळीवर मांडण्यात आला.


निपाणी सावरगाव येथे ग्रामस्थांसाठी स्मशानभूमीची योग्य जागा उपलब्ध करून देण्यासह अंत्यसंस्कारासाठी आवश्यक शेड, रस्ता, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रश्नासाठी आकाश पाटील कोकणे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, प्रश्न प्रलंबित राहिल्याने अखेर गेल्या सहा दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.


उपोषणाची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठणकर, तालुकाध्यक्ष विष्णू पाटील, राजू कांबळे, विकास नरबागे, अनिल अक्यमवार, प्रदीप वाघमारे, सरपंच तुकाराम पाटील कोकणे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.


दरम्यान, रामदास पाटील सुमठणकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क साधून निपाणी सावरगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन देत संबंधित प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्यासाठी वेळ दिला.


जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेनुसार कार्यवाही सुरू झाली आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी रामदास पाटील सुमठणकर यांनी आज तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO) आणि उपविभागीय अधिकारी (उपजिल्हाधिकारी) यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. स्मशानभूमीसाठी जागा व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
या वेळी उपोषणकर्ते आकाश पाटील कोकणे, तुकाराम पाटील कोकणे, दिगंबर राजाळे, माधव वाघमारे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील कोकणे, परमेश्वर कोकणे, नंदू कोकणे, पत्रकार प्रभू वंकलवार यांच्यासह समस्त ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
आश्वासनाची पूर्तता कधी?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले असले तरी स्मशानभूमीचा प्रश्न प्रत्यक्षात किती दिवसांत मार्गी लागतो, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने दिलेल्या वेळेत आवश्यक कार्यवाही करून स्मशानभूमीसाठी जागा, शेड, रस्ता, पाणी आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
