चार महिन्यांपासून आधार केंद्र बंद; देगलूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे बोंबाबोंब आंदोलन

देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर येथील पोस्ट कार्यालयातील आधार कार्ड नोंदणी केंद्र मागील चार महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. हे केंद्र तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या औचित्याने पोस्ट कार्यालयासमोर बोंबाबोंब बोंबमारो आंदोलन व निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी केले.

देगलूर तालुक्यातील नागरिकांसाठी पोस्ट कार्यालयातील हे एकमेव सुरू असलेले आधार केंद्र होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून ते बंद असल्याने आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती तसेच इतर आधारसंबंधित कामांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना आणि विविध प्रशासकीय कामांसाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

यापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून तसेच नांदेडचे मुख्य अधीक्षक पाठक व उपमुख्य अधीक्षक कुलकर्णी यांना निवेदन देऊन आधार केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. केंद्र सुरू न झाल्यास पोस्ट कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, अद्याप केंद्र सुरू न झाल्याने अखेर आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी “बंद असलेले आधार केंद्र त्वरित सुरू करा”, “नागरिकांची होणारी हेळसांड थांबवा” अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. आधार केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना इतर ठिकाणी जाण्यासाठी वेळ आणि पैसे खर्च करावे लागत असून, अनेकांना पहाटेपासून रांगेत उभे राहण्याची वेळ येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

आंदोलनात शिवसेना देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, देगलूर शहरप्रमुख भगवान जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी उपजिल्हाप्रमुख नागनाथ वाडेकर, मुखेड तालुकाप्रमुख उमेश पाटील आडलूरकर, मष्णाजी पैलावार, विनोद सोनकांबळे, अशोक कांबळे, मानाजी लोणे, लोणीकर, गंगाधर पाटील चाकूरकर, राजू उल्लेवार, हाणमंत राजुरे लख्खेकर, संजय पाटील मंगरुळे लख्खेकर, अशोक मारवाडे कावळगड्डेकर, शिवाजी पाटील, दत्ता राजुरे, शिवाजी चव्हाण, शंकरराव जाधव, अर्जुन लूटे, राजू जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनानंतर पोस्ट कार्यालयाचे अधिकारी पवार यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून लवकरच आधार केंद्र सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता प्रत्यक्षात आधार केंद्र कधी सुरू होते, याकडे देगलूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!