मातृतीर्थ तलावात भाविकाचा बुडून मृत्यू; रानडुकराच्या हल्ल्यात दुसरा जखमी

२५ किलोमीटर परिक्रमा पूर्ण केल्यानंतर आंघोळीसाठी तलावात उतरला; सहा महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले

श्रीक्षेत्र माहूर | राज ठाकूर| माहूरगडावर भरणाऱ्या मोठ्या यात्रांपैकी सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्षाबंधन परिक्रमा यात्रेला दोन दुर्दैवी घटनांनी गालबोट लागले. परिक्रमा यात्रेसाठी वाशिम जिल्ह्यातून आलेल्या २८ वर्षीय भाविकाचा मातृतीर्थ तलावात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत अनुसया माता मंदिर परिसरातील जंगलात रानडुकराने केलेल्या हल्ल्यात ३५ वर्षीय भाविक जखमी झाला. या दोन्ही घटना २८ ऑगस्ट रोजी घडल्या.

२५ किलोमीटर परिक्रमा पूर्ण केली अन् काळाने घात केला

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील गायवळ येथील अनिकेत वाल्मिक तूरक (वय २८) हा आपल्या मित्र, बहीण, पुतण्या यांच्यासह सुमारे १० ते १२ भाविकांसोबत २७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन परिक्रमा यात्रेनिमित्त माहूरला आला होता. रात्रभर विविध देवदेवतांचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी सुमारे २५ किलोमीटरची परिक्रमा पूर्ण केली.

परिक्रमा पूर्ण करून सकाळी सुमारे ९ वाजता शहरातील टी-पॉईंट परिसरात आल्यानंतर अनिकेत हा आंघोळ करण्यासाठी मातृतीर्थ तलावाकडे गेला. त्याला पोहता येत असल्याने तो पाण्यात उतरला आणि पोहत पोहत तलावात सुमारे ७० फूट अंतरावर गेला. मात्र, अचानक तो पाण्यात बुडाला. उपस्थित भाविकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश आले नाही.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभिजीत जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे, मुख्याधिकारी विवेक कांदे, रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त संजय काण्णव, वनपाल मनोहर कातुंलवार, मिर साजिद अली, योगेश साबळे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, शरद घोडके यांच्यासह प्रशासन व पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली.

दहिसावळी येथील पोहण्यात तरबेज भोई बांधवांना पाचारण करून मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला. तलावातील पाण्याची खोली अधिक असल्याने शोधमोहीम आव्हानात्मक ठरली. अखेर दुपारी सुमारे ३ वाजता अनिकेतचा मृतदेह शोधण्यात यश आले.

अनिकेत हा शेतकरी असून त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि अवघ्या सहा महिन्यांची मुलगी असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जमादार सत्यपाल मडावी यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

जंगलात दबा धरून बसलेल्या रानडुकराचा हल्ला – दरम्यान, दुसऱ्या घटनेत वाशिम जिल्ह्यातील वारला येथील रामदास कोंडबा असवले (वय ३५) हे आपल्या मित्रांसह परिक्रमा यात्रेसाठी माहूर येथे आले होते. २८ ऑगस्ट रोजी अनुसया माता मंदिराच्या खालील जंगल भागातून जात असताना ते लघुशंकेसाठी बाजूला गेले. यावेळी दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीला चावा घेतला.

रामदास यांनी आरडाओरड केल्यानंतर रानडुक्कर तेथून पळून गेले. त्यांच्या मित्रांनी तातडीने अनुसया माता मंदिर परिसरातील रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश नागरगोजे यांनी त्यांच्यावर उपचार केले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, वनपाल मनोहर कातुंलवार आणि वनरक्षक दीपक माने यांनी रुग्णालयात जाऊन रामदास यांची भेट घेतली. तसेच उपचारासाठी त्यांना आर्थिक मदत करण्यात आली.

परिक्रमा यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक माहूरमध्ये दाखल होत असताना एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मातृतीर्थ तलाव परिसरात पाण्यात उतरणाऱ्या भाविकांनी विशेष काळजी घेण्याची, तसेच जंगल परिसरात एकट्याने न जाण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!