
टेंभुर्णीच्या आरती माने-पाटीलचा संघर्षमय यशस्वी प्रवास; ज्या शाळेत शिकली, त्याच शाळेत झाला सत्कार


हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेल्या टेंभुर्णीच्या लेकीने आपल्या जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. कु. आरती मारोतराव माने-पाटील हिने मार्च २०२६ मध्ये झालेल्या TET पात्रता परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून, तिची यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टेंभुर्णीच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.


आरती माने-पाटील हिने आपल्या शैक्षणिक प्रवासाची मुहूर्तमेढ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टेंभुर्णी येथून रोवली. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने नांदेड येथील सायन्स कॉलेजमधून एम.एस्सी. (Physics) पदवी संपादन केली. त्यानंतर बी.एड. पूर्ण करून शिक्षक होण्याचे ध्येय निश्चित केले.


ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील परिस्थितीशी दोन हात करत आरतीने शिक्षणाची कास सोडली नाही. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने मार्च २०२६ मधील TET परीक्षेत यश मिळविले. त्यानंतर तिची यवतमाळ जिल्हा परिषदेत माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली.


आपल्या शाळेतील विद्यार्थिनीने मिळविलेल्या या यशाचा आनंद द्विगुणित करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टेंभुर्णी यांच्या वतीने आरतीचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्या शाळेतून तिच्या शिक्षणाची सुरुवात झाली, त्याच शाळेत तिचा गौरव होणे हा तिच्या शैक्षणिक प्रवासातील भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला.
आरतीच्या यशामुळे माने-पाटील कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, टेंभुर्णी गावातही तिचे कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीची कारणे न देता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपले ध्येय गाठावे, असा प्रेरणादायी संदेश आरतीच्या यशातून मिळत आहे.
‘शेतकऱ्याच्या घरची लेक ते जिल्हा परिषद शिक्षिका’ हा आरतीचा प्रवास टेंभुर्णीतील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला असून, तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
