
धनादेश क्लिअरन्ससाठी ग्राहकांच्या चकरा, कर्ज व कृषी कर्जाच्या कामांनाही फटका
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैंक (State Bank of India) च्या शाखेतील भोंगळ कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला असून, गेल्या पंधरा दिवसांपासून सीटीएस (Cheque Truncation System) मशीन बंद असल्याने सर्वसामान्य ग्राहक आणि व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. धनादेश क्लिअरन्सपासून कर्ज, कर्जमाफी आणि कृषी कर्जाशी संबंधित कामांना विलंब होत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


हिमायतनगर शहरातील ग्राहक-व्यापारी गजानन मुत्तलवाड यांनी मागील पंधरा दिवसांपासून धनादेश क्लिअरन्ससाठी बँकेच्या चकरा मारूनही काम होत नसल्याचा आरोप केला आहे. शाखेतील चेक तपासणीसाठी आवश्यक असलेले सीटीएस मशीन बंद असल्याने धनादेश वटविण्याची प्रक्रिया रखडली असल्याचे त्यांनी सांगितले.


दुसऱ्या एसबीआय शाखेत गेल्यावरही ‘तुमच्या गावातच शाखा आहे’ धनादेश क्लिअर होत नसल्याने पर्याय म्हणून इतर ठिकाणच्या एसबीआय शाखेत चेक घेऊन गेले असता, “तुमच्या गावातच शाखा आहे ना… तिथेच चेक क्लिअर का करत नाही?” असे सांगून परत पाठवले जात असल्याचा आरोप मुत्तलवाड यांनी केला आहे. यामुळे व्यापारी वर्गासह सर्वसामान्य ग्राहकांची मोठी कोंडी होत असून, बँक ग्राहकांची की ग्राहक बँकेची सेवा करत आहेत? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.


टेक्निशियन येत नाही म्हणून समस्या? शाखाधिकारी म्हणतात—‘मी काय करू शकतो?’ या प्रकाराबाबत हिमायतनगर एसबीआयचे शाखाधिकारी गौरव सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी टेक्निशियनसाठी दोन-तीन वेळा पाठपुरावा केल्याचे सांगितले. मात्र हिमायतनगर शहरातील शाखेत टेक्निशियन येण्यास तयार नसल्यामुळे ही अडचण निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


“टेक्निशियनला आम्ही दोन-तीन वेळा पाठपुरावा केला; पण तो हिमायतनगरला यायला तयार नाही. त्यामुळे ही अडचण उद्भवत आहे. त्यापेक्षा मी काय करू शकतो?”, अशा आशयाची भूमिका शाखाधिकाऱ्यांनी मांडल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. मात्र, एका राष्ट्रीयकृत बँकेची यंत्रणा केवळ टेक्निशियन येत नसल्याच्या कारणावर पंधरा दिवस ठप्प राहू शकते का? संबंधित यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाही का, असा सवाल ग्राहकांकडून केला जात आहे.
ग्राहकांचा कल खासगी बँकांकडे – हिमायतनगर एसबीआयमध्ये सातत्याने उद्भवणाऱ्या विविध समस्यांमुळे शहरातील व्यापारीच नव्हे तर सर्वसामान्य ग्राहकांचाही कल आता खासगी बँकांकडे वळू लागल्याची चर्चा आहे. ग्राहकांना वेळेवर सेवा मिळत नसेल तर राष्ट्रीयकृत बँकेवरील विश्वास कायम कसा राहणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. हिमायतनगरसारख्या शहरात ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता एसडीबीएफ, आयडीबीआयसह अन्य राष्ट्रीयकृत व खासगी बँकांच्या अधिक शाखांची गरज असल्याचे मत व्यापारी व ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.
‘माझी तक्रार केवळ माझ्यासाठी नाही’ गजानन मुत्तलवाड यांनी सांगितले की, बँकेतील अडचणींबाबत नांदेडच्या मुख्य शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार करणार असून, हिमायतनगरमधील इतर नागरिकांनाही अशाच समस्यांना सामोरे जावे लागू नये, एवढीच माफक अपेक्षा आहे.
दरम्यान, सीटीएस मशीन तातडीने सुरू करून रखडलेले धनादेश स्कॅनिंग/डिजिटल इमेजिंग, चेकवरील रक्कम, खाते क्रमांक, MICR इत्यादी माहिती प्रक्रिया पूर्ण करावी, आणि चेकची प्रत्यक्ष कागदपत्रे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पाठवण्याऐवजी डिजिटल पद्धतीने क्लिअरिंगसाठी पाठवली जाण्यात येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करव्यात. आणि रक्कम ट्रान्सफर, कर्ज, कृषी कर्ज आणि कर्जमाफीशी संबंधित विविध कामांना गती द्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
पंधरा दिवस मशीन बंद, मग ग्राहकांनी किती दिवस वाट पाहायची? “टेक्निशियन येत नाही” हे कारण सांगून ग्राहकांना सेवा नाकारता येणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन हिमायतनगर शाखेतील सीटीएस यंत्रणा पूर्ववत करावी आणि ग्राहकांना होत असलेल्या त्रासाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
