
नांदेड, प्रतिनिधी| श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काबरानगर येथील श्रीकृष्ण मंदिरात २७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान ‘श्रीकृष्णकथामृत’ अर्थात श्रीकृष्ण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ह.भ.प. श्री विक्रमजी नांदेडकर यांच्या अमृतमय वाणीतून भाविकांना श्रीकृष्ण चरित्र व भक्तीमय कथांचे श्रवण करता येणार आहे.


श्रीकृष्ण आणि श्रीराम हे भारतीय संस्कृतीतील आराध्य दैवत मानले जातात. त्यांच्या जन्मोत्सवाला देशभरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. याच पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने काबरानगर येथील श्रीकृष्ण मंदिर विश्वस्तांच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जन्मोत्सव ४ सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे.


परमपूज्य वरदानंद भारती यांनी रचलेले ‘श्रीकृष्णकथामृत’ हे श्रीकृष्ण चरित्राचे साररूप मानले जाते. त्यांच्या शिष्योत्तम ह.भ.प. श्री विक्रमजी नांदेडकर यांच्या रसाळ आणि ओघवत्या वाणीतून ही कथा ऐकण्याची संधी नांदेडकरांना मिळणार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे.


या कथामृत सोहळ्याचा नांदेड शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीकृष्ण मंदिर विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.


