NHAI फिरते पथकाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; आर्थिक वसुलीच्या आरोपांची चौकशी करा

सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांची मागणी

नांदेड, प्रतिनिधी| खडकूत येथील किया शोरूमसमोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) फिरत्या पथकाने मोटारसायकली हटविण्याची कारवाई केल्याने वाहनधारकांमध्ये काही काळ गोंधळ व धावपळ उडाली. या कारवाईदरम्यान नागरिकांना धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, परिसरातील व्यावसायिकांकडून आर्थिक वसुली केली जात असल्याच्या चर्चेचीही निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी केली आहे.

शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता कॉ. गंगाधर गायकवाड हे वाहन सर्व्हिसिंगसाठी खडकूत येथील किया शोरूममध्ये गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. NHAIची चारचाकी सायरन वाजवत शोरूमसमोर आली. वाहनामध्ये अंदाजे ७ ते ८ व्यक्ती असल्याचे दिसून आले. त्यापैकी काही जणांनी खाकी रंगाचे कपडे परिधान केले होते. संबंधित व्यक्ती पोलीस नसतानाही पोलीस असल्याचा आभास निर्माण करत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

पथकातील एका साध्या वेशातील व्यक्तीने ध्वनिक्षेपकाद्वारे शोरूमसमोरील मोटारसायकली तात्काळ हटविण्याच्या सूचना दिल्या. वाहने न हटवल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शोरूममधील कामगार व ग्राहकांच्या अंदाजे ७० ते ८० मोटारसायकली मुख्य महामार्गापासून सुमारे ६० ते ७० फूट अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेत उभ्या होत्या. मुख्य रस्ता आणि वाहनांच्या जागेदरम्यान सुमारे १५ ते २० फुटांची नाली अथवा मोकळी जागा असल्याने या वाहनांमुळे महामार्गावरील वाहतुकीला प्रत्यक्ष अडथळा निर्माण होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, NHAIच्या पथकाच्या वाहनाजवळ फ्रुट मार्केटमधील एका युवकाचा कर्मचाऱ्यांशी वाद सुरू असल्याचेही दिसून आले. संबंधित युवकाने शहराकडे येणाऱ्या रस्त्यावरील फ्रुट मार्केट परिसरातील एका फळ विक्रेत्याकडून पथकातील व्यक्तींनी ६ हजार रुपये घेतल्याचा आरोप केला असून, ही रक्कम परत करण्याची मागणी केल्याचे सांगण्यात आले. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

याच पार्श्वभूमीवर स्थानिक व्यावसायिकांकडून नियमितपणे आर्थिक वसुली करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

विशेष म्हणजे, किया शोरूमच्या बाजूलाच पेट्रोल पंप असून सीएनजी भरण्यासाठी चारचाकी वाहनांची मोठी रांग लागते. ही रांग कधी कधी सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, तेथे अशाच प्रकारची कारवाई केली जात नसल्याने संबंधित कारवाई भेदभावपूर्ण होती का आणि त्यामागे आर्थिक वसुलीचा हेतू होता का, याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करताना संबंधित पथकाला देण्यात आलेले अधिकार, वाहन जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया, त्या दिवशीच्या कारवाईचे आदेश, पथकातील कर्मचाऱ्यांची ओळख तसेच आर्थिक वसुलीच्या आरोपांची सत्यता तपासावी, असे कॉ. गंगाधर गायकवाड यांनी म्हटले आहे.

परिसरातील CCTV फुटेज, NHAI वाहनाचे GPS व कॅमेरा रेकॉर्ड, पथकातील कर्मचाऱ्यांची अधिकृत नोंद आणि कारवाईसंदर्भातील आदेश तपासल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी आठ दिवसांच्या आत संबंधित पथकावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल संघटनेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रकल्प संचालकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीवर कार्यवाही न झाल्यास नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!